पुणे - पुस्तकप्रेमी आणि कलेच्या चाहत्यांसाठी ‘साहित्य 2025’ हा पुण्यातील सर्वात मोठा साहित्य महोत्सव 22 ते 26 जानेवारी दरम्यान आयोजित केला जाणार आहे. हिंजवडी येथील एलप्रो इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात हा महोत्सव पार पडणार आहे. साहित्य, कला आणि संस्कृतीचा संगम घडवणाऱ्या या पाच दिवसांच्या महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल.
या महोत्सवात प्रख्यात लेखक आणि विचारवंतांची हजेरी लागणार आहे. अंकुर वारिकू, अक्षत गुप्ता, शबनम मिंवाला आणि मनोज मुंतशिर शुक्ला हे लेखक त्यांच्या साहित्य प्रवासातील अनुभव आणि प्रेरणादायी गोष्टी सांगणार आहेत. वाचकांना नवीन दृष्टिकोन मिळवण्यासाठी ही सत्रे नक्कीच महत्त्वाची ठरणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वडाली ब्रदर्स यांचे सुमधुर गायन, रंजिनी सुरेश यांचे पारंपरिक कथकली नृत्य, आणि ममे खान यांचे खास सादरीकरण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल.
महोत्सवात वेगवेगळ्या वयोगटांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रमदेखील ठेवण्यात आले आहेत. अमर चित्र कथा आयोजित सर्जनशील लेखन कार्यशाळा, ओपन माईक स्पर्धा, स्क्रॅबल खेळ, आणि ग्रँड लिटरेरी तांबोळा या उपक्रमांमुळे सहभागींच्या कल्पकतेला नवा आयाम मिळेल. पुस्तकप्रेमींना आकर्षित करण्यासाठी क्रॉसवर्डकडून भव्य पुस्तक मेळा आयोजित केला जाणार आहे. येथे 50% पर्यंत सवलतीत विविध पुस्तके खरेदी करता येतील. पुस्तक मेळा दररोज सकाळी 10:30 ते रात्री 9:00 या वेळेत सुरू राहील.
महोत्सवाला विनामूल्य प्रवेश आहे. मात्र, काही सत्रांसाठी आणि कार्यशाळांसाठी पूर्वनोंदणी गरजेची आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी saahityalitfest.com या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे. साहित्य 2025 हा महोत्सव साहित्य, कला आणि सर्जनशीलतेचा आनंद घेण्यासाठी पर्वणी ठरणार आहे. कुटुंबासह या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.