पुणे : विधानसभा अधिवेशनात पुण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वच आमदारांकडून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले गेले, त्यावर चर्चा झाली. मात्र, त्यावर ठोस असे निर्णय काहीच झाले नाहीत. बघू, करू, बैठक घेऊ, माहिती घेण्यात येईल यातच प्रश्न अडकून राहिले. पुण्याचे वैभव असलेला गणेशोत्सव राज्य उत्सव करण्याच्या आमदार हेमंत रासने यांच्या मागणीला लगेच सरकारने मान्यता दिली. हे पुण्यासाठी या अधिवेशनाील वैशिष्ट्य ठरले. मात्र, सार्वजनिक वाहतूक कार्यक्षम करणे, वाहतूककोंडी कमी करणे यांसारखे विषय अस्पर्शितच राहिले.
विधानसभेत पुणे शहर हद्दीत येणाऱ्या कसब्यातून हेमंत रासने, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे, कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे प्रतिनिधित्व करतात. उपनगरांमध्ये येणाऱ्या वडगाव शेरीत बापू पठारे, खडकवासल्यात भीमराव तापकीर व हडपसरमधून चेतन तुपे हे आमदार आहेत. यातील एकटे बापू पठारे वगळता उर्वरित ७ ही आमदार सत्ताधारी आहेत. त्यातही चंद्रकांत पाटील व माधुरी मिसाळ हे मंत्री आहेत. चेतन तुपे, बापू पठारे वगळता सर्व आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. तुपे सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आहेत. विधानपरिषदेमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या डॉ. नीलम गोऱ्हे व भाजपचे योगेश टिळेकर हे राज्याचे प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत. यातील डॉ. गोऱ्हे या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत.
राज्यभरातील २८८ आमदार विधानसभेत, ७८ आमदार विधानपरिषदेत असतात. इतक्या गर्दीत अधिवेशनादरम्यान बोलण्याची, प्रश्न मांडण्याची, त्यावर चर्चा घडवून आणण्याची संधी मिळणे दुरापास्तच असते. लक्षवेधी, औचित्याचा मुद्दा, तारांकित प्रश्न या स्वरूपात अनेकजण लेखी प्रश्न देतातच, त्यांना संबंधित मंत्र्याकडून लेखी उत्तरे मिळतात. काही आमदारांना बोलण्याची संधी मिळते, काहींना नाही. मंत्री असल्यामुळे चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, विधानपरिषदेच्या उपसभापती असल्याने डॉ. गोऱ्हे यांना प्रश्न मांडण्याची संधी फार कमी प्रमाणात मिळते किंवा मिळतच नाही. त्यामुळे ते त्यांच्या प्रश्नांशी संबंधित मंत्र्यांना भेटून किंवा मग त्या त्या खात्याच्या सचिवांना वगैरे भेटून त्यांचे प्रश्न मार्गी लावतात.
सिद्धार्थ शिरोळे
- सार्वजनिक ठिकाणी लावल्या जाणाऱ्या सीसीटीव्हीच्या संदर्भात धोरण ठरवण्याची गरज व्यक्त करण्याचा प्रश्न मांडला. त्यावर गृहराज्यमंत्र्यांनी या विषयाशी संबंधित पोलिस, सार्वजनिक बांधकाम, स्थानिक स्वराज्य संस्था यांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला.- टेकड्यांवर टाकल्या जाणाऱ्या राडारोड्याकडे लक्ष वेधून कारवाईची मागणी.- इमारतींच्या वरून जाणाऱ्या ओव्हरहेड केबल्स तुटून खाली पडल्यावर होणाऱ्या अपघातांकडे लक्ष वेधले.- हिंजवडी मेट्रोच्या कामातील गणेशखिंडीतील दुहेरी पुलाच्या कामाचा विषय उपस्थित करीत कामाला गती मिळावी, असे सांगितले.- धोकादायक वृक्षांच्या फांद्या तोडण्यासाठी उद्यान विभागाला सवलतीचे दर लावण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली.- स्तनाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी आयुर्वेद व योग उपचारपद्धतीचा वापर करण्याची सूचना केली.
सुनील कांबळे
- हर्बलच्या नावाखाली सुरू असणाऱ्या अवैध हुक्का पार्लरवर कारवाई करण्याची मागणी.- रस्त्यावर अडथळे ठरणाऱ्या अतिक्रमणांवर त्वरित कारवाई करण्याच्या मागणीची सरकारकडून दखल, दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा सरकारचा आदेश.- कॅन्टोन्मेंटमधील नागरी परिसराचा महापालिकेत समावेश होण्याच्या मागणीला सरकारी मान्यता.- सीईटी परीक्षांमधील गोंधळ, शुल्क अनियमितता व विलंब यांकडे सरकारचे लक्ष वेधले.
भीमराव तापकीर
- विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची मागणी.- महापालिकेत समाविष्ट गावांमधील नागरी सुविधांच्या अभावाकडे लक्ष वेधले.- आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाईची मागणी.- धरणग्रस्त शेतकऱ्यांवर जलसंपदाकडून होणाऱ्या अन्यायावर टीका.- रिंग रोडबाधित शेतकऱ्यांना न्यायसुसंगत मोबदला देण्याची मागणी.
हेमंत रासने
- गणेशोत्सव राज्य महोत्सव करण्याची मागणी त्वरित मान्य झाली.- डोक्यावरून मैला वाहणाऱ्या पंढरपूरमधील २१३ कुटुंबांच्या घरांचा प्रश्न सोडवून घेतला.- स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित निकालावर व यादी जाहीर होण्यावर प्रश्न.- राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील हरणांच्या आकस्मिक मृत्यूची चौकशी करण्याची मागणी.- वाहतूककोंडीचा प्रश्न मांडून त्यावरील उपाययोजनांवर चर्चा.- स्वच्छ कसबासाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती.- जुन्या वाड्यांच्या विकासाचा प्रश्न उपस्थित केला.
चेतन तुपे
- स्वारगेट हडपसर मेट्रोच्या प्रस्तावाबाबत विचारणा.- हडपसरकडे येणाऱ्या रस्त्यावर सातत्याने होत असलेल्या वाहतूककोंडीचा प्रश्न उपस्थित करत त्यावर त्वरित प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी.- रिंग रोडच्या कामासंबंधी विचारणा.- थकीत मिळकत करासाठीच्या अभय योजनेबाबत प्रश्न उपस्थित केला.
बापू पठारे
- धानोरी, वडगाव शेरी, खराडी, परिसरात पावसामुळे होणाऱ्या पूरस्थितीचा प्रश्न मांडला, उपाययोजनांची मागणी केली.- शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची सक्ती करण्याची सूचना. स्वच्छतेसाठी मनुष्यबळ वाढवण्याचा प्रश्न.- पुणे शहरात सरकारी कर्करोग उपचार रुग्णालय सुरू करण्याबाबत सरकारला विचारणा.- पुणे महापालिकेतील अपुरे कर्मचारी.- महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्विकास विधेयकाच्या अंमलबजावणीतील अडचणी.
योगेश टिळेकर
- दहशतवादी कारवायांमध्ये आढळलेल्या कोंढवा परिसरातील वास्तू, व्यक्ती यांच्यावर कारवाई होण्याबाबत.- गुरुवार पेठ तसेच कात्रज परिसरात धार्मिकस्थळी झालेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार की नाही?- पुणे शहर व परिसरातील प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याबाबत काय उपाययोजना सुरू आहेत?- कात्रज चौकातील नव्या उड्डाणपुलाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल करण्याची मागणी.- पुणे महापालिकेवर समाविष्ट गावांमुळे येणाऱ्या प्रशासकीय ताणामुळे महापालिकेचे विभाजन करण्याबाबत.