पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 14:36 IST2025-09-24T14:25:10+5:302025-09-24T14:36:19+5:30
Navratri Dress, Ghagara Market: नवरात्रीच्या आधीचे व सुरु झाल्यानंतरचे दोन दिवस पावसात गेले आहेत. आज कुठे कडक उन पडले आहे.

पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
- हेमंत बावकर
नवरात्रीला दोन दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. २२ सप्टेंबरला जीएसटी कमी झाल्याने वाहन, इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये मोठी गर्दी उसळली आहे. परंतू, पुण्यातील उत्सव काळात गजबजलेल्या कपड्यांच्या मार्केटमध्ये पावसाच्या धास्तीने शुकशुकाट पसरलेला होता. पावसामुळे धंदाच होत नसल्याचे येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे होते.
नवरात्रीच्या आधीचे व सुरु झाल्यानंतरचे दोन दिवस पावसात गेले आहेत. आज कुठे कडक उन पडले आहे. हवामान विभागाने पुढील आठवडाभर महाराष्ट्रात पाऊस असल्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे याचा परिणाम नवरात्रीतील दांडियावर झाला आहे. दांडिया खेळण्यासाठी महिलांची पहिली पसंती घागऱ्याला असते. विविध नक्षीकाम केलेले, नव्या पॅटर्नचे ड्रेसही पसंत केले जातात. परंतू, पावसामुळे दांडियावरच पाणी फिरत असल्याने महिला वर्गाने या दरवर्षीच्या वेगळे, हटके दिसण्याच्या शॉपिंगकडेच पाठ फिरविली होती.
रविवार पेठेत मंगळवारी तसा शुकशुकाट होता. कपड्यांच्या एका दुकानात दोन व्यापारी एकत्र आले होते. यंदा नवरात्रीत पावसामुळे धंदाच होत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. येत्या काळात जर पावसाने उसंत घेतली तर महिलावर्ग शॉपिंगला येण्याची शक्यता आहे. अन्यथा नवरात्रीची खरेदी दिवाळीलाच होण्याची शक्यता आहे.
नवरात्रीमुळे व्यापाऱ्यांनी नवीन पॅटर्न, नवीन डिझाईन, रंगसंगतीचे कपडे आणलेले आहेत. साध्या दांडिया अगदी २० रुपयांपासून मिळत आहेत. परंतू, म्हणावी तशी गर्दी दुकानांत दिसत नाहीय. पावसामुळे दोन दिवसांचे दांडिया पाण्यात गेले आहेत. याचा फटका जीएसटी कमी झाला तरी व्यापाऱ्यांवर झाला आहे.