आंबेगाव तालुक्याच्या थोरांदळे गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:30 IST2025-04-01T18:29:14+5:302025-04-01T18:30:22+5:30
थोरांदळे परिसरात बिबट्याचा वावर होता, त्याने एका मजुरावर हल्ला केल्याने पिंजरा बसवण्यात आला होता

आंबेगाव तालुक्याच्या थोरांदळे गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
मंचर: आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे कामगारावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. फुटाणेमळा येथे लावलेल्या पिंजऱ्यात रात्री बिबट्या जेरबंद झाला.
थोरदांळे गावातील फुटाणेमळा या ठिकाणी वनविभागांने लावलेल्या पिंजऱ्यात साधारण पाच ते सहा वर्षांचा नर जातीचा बिबट्या राञीच्या बाराच्या सुमारास जेरबंद झाला. दोन दिवसांपूर्वी या परिसरात एका कामगारांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना या परीसरात घडली होती. या घटनेची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने ताबडतोब घटनास्थळी पिंजरा लावला होता. आज मध्यरात्री नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती स्थानिक लोकांनी वनमजूर महेश टेमगिरे यांना दिली. वनमजूर महेश टेमगिरे यांनी घटनेची माहिती वनपाल प्रदिप कासारे यांना दिली. घटनेची माहिती मिळताच सदर घटनास्थळी ताबडतोब वनपाल प्रदिप कासारे, ऋषिकेश कोकणे, बिबट कृतीदल गावडेवाडी मनोज तळेकर, चारूदत्त बांबळे, कुणाल गावडे, हर्षल चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला पहाटे अडीचच्या सुमारास ताब्यात घेतले. सदर घटनास्थळी थोरदांळे गावचे उपसरपंच संदिप टेमगिरे तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहून वनविभागाला मदत केली. वनविभागाने हल्ला करणारा बिबट्याला जेरबंद केल्याने वनविभागाचे आभार मानले.
थोरांदळे परिसरात बिबट्याचा वावर होता. या संदर्भात नागरिकांमध्ये वेळोवेळी जनजागृती केली. यंत्राच्या साह्याने आवाज काढून बिबट्या येथे येऊ नये याची काळजी घेण्यात आली. मात्र असे असतानाही एका मजुरावर बिबट्याने हल्ला केल्याने पिंजरा बसवण्यात आला होता. या पिंजऱ्यात हल्ला केलेला बिबट्या जेरबंद झाला असून त्याची रवानगी माणिक डोह निवारा केंद्रात केली जाणार आहे. - विकास भोसले, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी