दररोज नवा हल्ला, दर पाच वाड्यांत एक बिबट्या; पिंपरी परिसरात चाललंय तरी काय ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 09:37 IST2025-07-31T09:37:32+5:302025-07-31T09:37:32+5:30
ग्रामस्थ, शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थी भयभीत झाले आहेत. बिबट्याने आता गावातही प्रवेश केल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

दररोज नवा हल्ला, दर पाच वाड्यांत एक बिबट्या; पिंपरी परिसरात चाललंय तरी काय ?
पिंपरी पेंढार : पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) परिसरातील कोंबडवाडी, पिरपट, गाजरपट, जांभूळपट, घाडगेपट, खारावने आणि गावालगतच्या सर्वच भागात बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. सध्या शेतीच्या कामांना वेग आला असला, तरी रात्रंदिवस बिबट्याचा धोका कायम आहे. त्यामुळे ग्रामस्थ, शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थी भयभीत झाले आहेत. बिबट्याने आता गावातही प्रवेश केल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून बिबट्यांचे हल्ले वाढले असून, शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी आणि कुत्र्यांसह अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले आहेत. याशिवाय, दोन महिलांवर हल्ला करून त्यांना ठार करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी वन विभागाकडे पिंजरे लावण्याची मागणी केली असली, तरी पिंजऱ्यांमध्ये भक्षाचा अभाव किंवा बिबट्याचा पिंजऱ्यात न येणे यामुळे समस्या जैसे थे आहे. परिणामी, बिबट्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या बिबटे आणि त्यांच्या बछड्यांची संख्या कमालीची वाढली असून, प्रत्येक वाडीवस्तीवर बिबट्याचा वावर आहे.
गावात बिबट्याचा प्रवेश आणि वारंवार दर्शनामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेक पाळीव प्राणी जखमी झाले असून, मानवी जीवितहानी टाळण्यासाठी वन विभागाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. शेतीची कामे जोमात सुरू असली, तरी बिबट्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना शेतात काम करणे कठीण झाले आहे. दररोज कोणाला तरी बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी सांगितले की, वन विभागातर्फे परिसराची पाहणी करून आवश्यक ठिकाणी पिंजरे लावले जातील.