बाणेर : बावधन परिसरात सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्या दिसला. झाडीच्या दिशेने पळणाऱ्या या बिबट्याचा व्हिडीओ एका नागरिकाने टिपला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. काही रहिवाशांनी बिबट्याचे फोटो काढून वन विभागाला पाठवले. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा बिबट्याच्या पंजाचे ठसेही आढळले. त्यामुळे बिबट्या याच परिसरात असल्याचे वनविभागाने सांगितले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गेल्या आठ दिवसांपासून औंध–बावधन परिसरातच बिबट्याची हालचाल सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. बावधन चांदणी चौक परिसरात पसरलेल्या ५०० एकर फॉरेस्टमध्ये बिबट्याचे कायमस्वरूपी वास्तव्य असल्याचे वनविभाग व नागरिकांनी सांगितले. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे २:३० च्या सुमारास एका नागरिकाने रस्त्याच्या कडेला झाडीतून पळणारा प्राणी मोबाइलमध्ये कैद केला.
औंध, पाषाण आणि लोहगाव परिसरात बिबट्याचा शोध सुरू असून, सिंध सोसायटीतील सीसीटीव्हीतही त्याची हालचाल कैद झाली होती. मात्र, प्रत्यक्ष बिबट्या हाती लागत नव्हता. रविवारी मध्यरात्री माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी हॉटेल डी-पॅलेसच्या मागे दिसलेल्या बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याने चर्चेला आणखी उधाण आले. या पार्श्वभूमीवर वन विभागाचे पथक घटनास्थळी धावले, मात्र तोपर्यंत बिबट्या पसार झाला होता. तरीही परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवून सापळा रचण्यात आला आहे. बिबट्याच्या वारंवार दर्शनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वन विभाग व रेस्क्यू टीमकडून सतत परिस्थितीवर नजर ठेवण्यात येत आहे.
औंधमध्ये दिसलेला बिबट्याच बावधनमध्ये आला
बिबट्याचा व्हिडीओ एका नागरिकाने काढला आहे. तो व्हिडीओ तपासल्यानंतर औंध परिसरात यापूर्वी दिसलेला बिबट्या हाच असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. औंध येथून हा बिबट्या नॅशनल सोसायटी मार्गे बावधन टेकडीकडे आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून तो बावधन परिसरातील दाड झाडीत दडून बसला असून, रात्रीच्या वेळी शिकारीसाठी भटकत असल्याचे सांगितले जात आहे.
एका व्यक्तीने राम नदीत पाणी पितानाचे फोटो पाठवल्याने आमची टीम तेथे गेली. तेव्हा त्या भागात त्याच्या पायाचे ठसे दिसले, त्यामुळे बिबट्या याच भागात असल्याचे स्पष्ट झाले. बावधन परिसरातील टेकड्यावर मोठे जंगल असून, या ठिकाणी या पूर्वीही बिबट्या असल्याचे दिसून आले आहे. मात्र, तो आम्हाला पुन्हा दिसला नाही. त्यामुळे तेथे मोठा पहारा लावला आहे. - मनोज बारबोले, रेंज फॉरेस्ट ऑफिसर पुणे.
रेस्क्यू संस्थेच्या संस्थापिका नेहा पंचमिया यांनी नागरिकांना घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, तसेच बिबट्या दिसल्यास किंवा विश्वसनीय माहिती असल्यास वन विभागाच्या हेल्पलाइन १९२६ किंवा रेस्क्यूच्या ९१७२५१११०० या क्रमांकांवर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Web Summary : A leopard was spotted in Bavdhan, Pune, triggering alerts. Footprints confirmed its presence. Residents are urged to stay vigilant and contact authorities if sighted.
Web Summary : पुणे के बावडन में तेंदुआ दिखने से अलर्ट जारी कर दिया गया है। पदचिह्नों ने इसकी उपस्थिति की पुष्टि की। निवासियों से सतर्क रहने और दिखने पर अधिकारियों से संपर्क करने का आग्रह किया गया है।