पुणे : लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात बिबट्याचा वावर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असून, अद्याप वन विभागाला तो पकडण्यात यश आलेले नाही. २८ एप्रिलला बिबट्या प्रथमच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसल्यानंतर विमानतळ प्रशासन आणि वन विभागाने त्याला पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.वन विभागाने परिसरात पिंजरे बसवले आहेत तसेच ठिकठिकाणी जाळ्या लावून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. तरीदेखील बिबट्या अद्याप सापळ्यात आलेला नाही.
या संदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी वन विभाग आणि संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. बिबट्याच्या उपस्थितीमुळे विमानतळ परिसरात भीतीचे वातावरण असून, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.