Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 11:18 IST2025-12-16T11:17:15+5:302025-12-16T11:18:47+5:30
Leopard Pune Latest News: पुणे विमानतळ आणि इतर काही भागात बिबट्या दिसून आल्याने दहशतीचे वातावरण आहे. पुण्यातील आयटी पार्कमध्येही बिबट्यामुळे भीतीचे वातावरण असून, Cognizant या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी विशेष सूचना केल्या आहेत.

Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
आयटी हब असलेल्या पुण्यात सध्या बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसात पुणे आणि परिसरात काही ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले. तर विमानतळ परिसरात एक बिबट्या जेरबंद करण्यात आला. त्यामुळे आयटी पार्कमध्येही भीती निर्माण झाली असून, आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खबरदारी म्हणून विशेष सूचना केल्या आहेत.
Cognizant ने कर्मचाऱ्यांना काय सूचना केल्या आहेत?
अंधार पडल्यानंतर किंवा सूर्योदय होण्यापूर्वी एकटेच बाहेर पडू नका.
पायी चालत जाण्याऐवजी नेहमी ऑफिसच्या वाहनाचा किंवा शेअरिंग कॅबचाच वापर करा.
झाडी, जंगल याला लागून असलेल्या निर्मनुष्य परिरातील शॉर्टकर्ट मार्गांचा वापर अजिबात करू नका. रात्री उशिरा फेज २ कॅम्पसमध्ये गरज नसल्यास जाणे टाळा.
जर तुम्हाला कुठल्या प्राण्याच्या हालचाली दिसल्या, तर त्वरित सुरक्षा पथकाला कळवा. सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करा.
जर तुम्हाला बिबट्या दिसला, तर घाबरू नका. शांत रहा आणि पळू नका. कारण अचानक केलेल्या हालचालींमुळे बिबट्याला चिथावणी मिळू शकते.
राज्यात अनेक भागात बिबट्यांचा वावर
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. अनेक जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले झाल्याच्या घटनांचे पडसाद राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले होते. सरकारकडूनही बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.
पुणे शहर आणि जिल्ह्यातही काही ठिकाणी बिबटे आढळून आले. अहिल्यानगर जिल्ह्यातही काही ठिकाणी बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. रायगड जिल्ह्यातही दोन ठिकाणी बिबट्या दिसला. ऊस पट्टा असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांचा वावरामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.