बिबट्याने पुन्हा घेतला शेतकरी महिलेचा बळी; दौंडमध्ये दिवसाढवळ्या हल्ले, जनावरांबरोबर माणसांचीही शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 12:09 IST2024-12-08T12:09:43+5:302024-12-08T12:09:53+5:30

महिलेला बिबट्याने अचानक हल्ला करून उसाच्या शेतात फरफटत नेले, या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला

Leopard once again killed a farmer's wife; Daylight attacks in Daund, preying on animals as well as humans | बिबट्याने पुन्हा घेतला शेतकरी महिलेचा बळी; दौंडमध्ये दिवसाढवळ्या हल्ले, जनावरांबरोबर माणसांचीही शिकार

बिबट्याने पुन्हा घेतला शेतकरी महिलेचा बळी; दौंडमध्ये दिवसाढवळ्या हल्ले, जनावरांबरोबर माणसांचीही शिकार

वरवंड : कडेठाण (ता. दौंड) येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.७) सायंकाळी घडली. लताबाई बबन धावडे (वय ५०, रा. कडेठाण) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

दौंड तालुक्यात बिबट्याने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. भीमा नदीच्या पट्ट्यात असलेल्या दौंड तालुक्यातील कानगाव, हातवळण, नानगाव, कडेठाण तर शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, गणेगाव, सादलगाव, वडगाव रासाई या भागात बिबट्याने तांडव केले आहे. शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांची शिकार करणारा बिबट्या आता माणसाचीही दिवसाढवळ्या शिकार करू लागला आहे. जी भीती शेतकऱ्यांना आणि नागरिकांना होती, ती भीती आता खरी ठरू लागली आहे. वनविभागाच्या निष्कर्ष आणि हलगर्जीपणामुळे दौंड तालुक्यात दोघांचा निष्पाप बळी गेला आहे. शनिवारी कडेठाण हद्दीत सायंकाळी लताबाई धावडे या स्वत: च्या शेतात काम करत होत्या. तर परिसरात अन्य काही शेतकरी शेतीची कामे करत होते. दरम्यान, लताबाई धावडे यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला करून त्यांना उसाच्या शेतात फरफटत नेले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना एका मजुराच्या लक्षात येताच त्याने आरडाओरडा केल्याने उघडकीस आली.

घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कडेठाण परिसरात बिबट्याकडून हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पिंजरा लावून पकडलेले बिबटे नक्की सोडले कुठे, असा प्रश्न योगेश दिवेकर यांनी उपस्थित केला तर पोलिस पाटील सुहास दिवेकर यांनी बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी केली. यावेळी परिसरात पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, अशी ग्वाही दौंडचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली.

Web Title: Leopard once again killed a farmer's wife; Daylight attacks in Daund, preying on animals as well as humans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.