दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेवर बिबट्याने केला हल्ला; मंचर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:36 IST2025-07-17T17:36:01+5:302025-07-17T17:36:13+5:30
मंचर : दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना लौकी येथे घडली आहे. शोभा दगडू काळे (वय ३७) यांच्यावर ...

दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेवर बिबट्याने केला हल्ला; मंचर येथील घटना
मंचर : दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना लौकी येथे घडली आहे. शोभा दगडू काळे (वय ३७) यांच्यावर बुधवारी रात्री नऊच्या दरम्यान राणूबाई मंदिराजवळ बिबट्याने हल्ला केल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चांडोली येथून लौकी या ठिकाणी दुचाकीवरून मुलगा स्वप्निल काळे, बहीण माधुरी पारधी आणि शोभा काळे हे तिघेजण येत होते. लौकी गावच्या हद्दीतील राणूबाई माता मंदिराजवळील बाळू थोरात यांच्या विहिरीजवळ बिबट्या कुत्र्याला पकडण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी दुचाकी अचानक आडवी आली असता, दुचाकीवरील शोभा काळे यांच्या पायावर बिबट्याने हल्ला केला. यावेळी मुलगा स्वप्निल काळे यांनी प्रसंगावधान राखून गाडी वेगाने पळविल्याने बिबट्याच्या तावडीतून त्यांची सुटका झाली. लौकी गावात हॉटेलवर स्वप्निल काळे व त्यांचे कुटुंबीय गेले असता त्यांनी हल्ला झाल्याची घटना सांगितली.
वनसेवक जालिंदर थोरात यांनी रेस्क्यू टीमला फोन करून बोलावले यावेळी रेस्क्यू टीम बरोबर जालिंदर थोरात, मंगेश औटी हे शोभा काळे यांना घेऊन मंचर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दाखल झाले. या ठिकाणी वनअधिकारी विकास भोसले व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. लौकी येथे बिबट्याचे वारंवार हल्ले होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा. अशी मागणी लौकी ग्रामस्थांनी केली आहे.