वनविभागाने तातडीने सर्व बिबट्यांचे रेस्क्यू करा;जीवितहानी होऊ नये - एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 10:59 IST2025-11-07T10:58:53+5:302025-11-07T10:59:26+5:30
वनविभागाने तातडीने सर्व बिबट्यांचे रेस्क्यू करून परिसर पूर्णपणे बिबटमुक्त करावा. तुमच्या पद्धतीने उपाययोजना करा, पण यापुढे एकही बिबट्या दिसू नये आणि जीवितहानी होऊ नये

वनविभागाने तातडीने सर्व बिबट्यांचे रेस्क्यू करा;जीवितहानी होऊ नये - एकनाथ शिंदे
मलठण : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड व जांबूत परिसरातील बिबट्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीनही कुटुंबीयांच्या दुर्दैवी घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केले. या घटना "अतिशय दुर्दैवी आणि दुःखद" असल्याचे सांगतानाच, पीडित कुटुंबांना सांत्वन भेट दिली. वनविभागाला तातडीने परिसर बिबट्यामुक्त करण्याचे आदेश देतानाच, ग्रामस्थांच्या इतर मागण्यांनाही प्रतिसाद दिला.
पिंपरखेड (ता. शिरूर) परिसरात गेल्या २० दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात शिवण्या शैलेश बोंबे, जांबूत येथील भागूबाई जाधव आणि रोहन विलास बोंबे या तिघांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. संतप्त ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्ग १८ ते २० तास रोखून धरला होता, तर बेल्हा-जेजुरी हायवेवर दोन वेळा मोठी आंदोलने झाली. प्रत्येक गावात उद्रेक पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी तीन वाजता एकनाथ शिंदे यांनी पिंपरखेडला भेट दिली. भेटीदरम्यान ग्रामस्थांनी बिबटमुक्तीसाठी उपाययोजना करण्याची व्यथा मांडली. यावर शिंदे म्हणाले, "वनविभागाने तातडीने सर्व बिबट्यांचे रेस्क्यू करून परिसर पूर्णपणे बिबटमुक्त करावा. तुमच्या पद्धतीने उपाययोजना करा, पण यापुढे एकही बिबट्या दिसू नये आणि जीवितहानी होऊ नये." या सूचना वनविभागाला देण्यात आल्या.
पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीची विनंती केली. यावर शिंदे म्हणाले, "प्रथम बिबट्यांचा पूर्ण बंदोबस्त करूया. त्यानंतर सर्व मागण्या गांभीर्याने घेऊन टप्प्याटप्प्याने पूर्ण करू." तसेच, ग्रामस्थांनी पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली असता, "हा प्रश्न मार्गी लावला जाईल. मी आमदार भरत गोगावले यांना या भागाचा दौरा करायला लावतो. त्यानंतर रस्ते व इतर समस्या सोडवू," असे आश्वासन दिले.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकरचे माजी चेअरमन देवदत्त निकम, उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहायक उपवनसंरक्षक स्मिता राजहंस, तालुका वन अधिकारी नीलकंठ गव्हाणे, पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र दाभाडे, उपसरपंच विकास वरे, देविदास दरेकर, सरपंच रवी वळसे, चेअरमन किरण ढोमे, जांबूतचे सरपंच दत्ता जोरी, नाथा जोरी, आदी उपस्थित होते.