Leopard Attack : ओतूरमध्ये भरदिवसा बिबट्याचा हल्ला; तरुण शेतकरी गंभीर जखमी, परिसरात दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 19:20 IST2026-02-11T19:20:18+5:302026-02-11T19:20:35+5:30
या प्रकारामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

Leopard Attack : ओतूरमध्ये भरदिवसा बिबट्याचा हल्ला; तरुण शेतकरी गंभीर जखमी, परिसरात दहशत
ओतूर (जुन्नर) - जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात भरदिवसा बिबट्याने हल्ला करून एका तरुण शेतकऱ्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
धनंजय नारायण डुंबरे (वय ३१) असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून, आवळी शिवारातील विजय घोलप यांच्या शेतात ही घटना घडली. दुपारच्या वेळी धनंजय आपल्या कांद्याच्या पिकाला पाणी देत असताना शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली.
हा हल्ला अनपेक्षित असल्याने त्यांना बचावाची संधीच मिळाली नाही. बिबट्याच्या हल्ल्यात त्यांच्या हात, पाय आणि पोटावर खोल जखमा झाल्या. जखमी अवस्थेत त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर जवळील शेतकरी आणि ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. लोकांचा आवाज ऐकताच बिबट्याने तेथून पळ काढला.
ग्रामस्थांच्या मदतीने धनंजय डुंबरे यांना तातडीने ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे आणि विश्वनाथ बेले यांच्यासह वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
दरम्यान, वाढत्या बिबट्याच्या हालचालींमुळे चिंताग्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची तसेच शेत परिसरात नियमित गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.