Leopard Attack : मरकळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराची बैलजोडी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 19:14 IST2025-12-30T19:13:59+5:302025-12-30T19:14:08+5:30
- वनविभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट; तातडीने भरपाई देण्याची मागणी

Leopard Attack : मरकळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराची बैलजोडी ठार
शेलपिंपळगाव : खेड तालुक्यातील मरकळ परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस धोकादायक होत असून, मंगळवारी (दि. ३०) पहाटे पाचच्या सुमारास बिबट्याने केलेल्या भीषण हल्ल्यात दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, हातावर पोट असलेल्या ऊसतोड मजुराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, मरकळ येथील पाटील वस्ती रोड परिसरात संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ऊसतोड मजूर समाधान भाऊराव पाटील यांची बैलजोडी बांधलेली होती. मंगळवारी पहाटेच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने या बैलांवर अचानक हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, यामध्ये दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. पहाटेच्या वेळी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. समाधान पाटील हे ऊसतोडीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन असलेली बैलजोडीच बिबट्याने ठार केल्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. "कष्टाने कमावलेली बैलजोडी गेल्यामुळे आता जगायचे कसे?" असा आर्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मरकळसह आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शेतात काम करताना किंवा रात्रीच्या वेळी बाहेर पडताना नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. वारंवार सूचना देऊनही वनविभागाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेमुळे मरकळ परिसरात भीतीचे सावट असून, वनविभाग आता तरी याकडे गांभीर्याने पाहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मृत बैलांचा तातडीने पंचनामा करून समाधान पाटील यांना शासकीय मदत मिळावी. नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात यावा. तसेच वनविभागाने रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी खेड तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक किरण लोखंडे यांसह ग्रामस्थांनी केली आहे.