Leopard attack : लग्नाला आता बिबट्याचं विघ्न..! बिबट्यांमुळे पोरांची लग्नंच होईनात, वराच्या माता पित्यांना नवं टेंशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:29 IST2025-11-13T16:27:50+5:302025-11-13T16:29:10+5:30
हे धक्कादायक वास्तव्य आहे... पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांमधील गावांचं..

Leopard attack : लग्नाला आता बिबट्याचं विघ्न..! बिबट्यांमुळे पोरांची लग्नंच होईनात, वराच्या माता पित्यांना नवं टेंशन
पुणे - जिल्ह्यात एक अनोखी परिस्थिती निर्माण झालीय. बिबट्याच्या भीतीमुळे गावागावात सोयरीकांचं गणितच बिघडलं आहे. होय, शेकडो तरुणांचं लग्न रखडलंय. आई-बाप चिंतेत, तर पोरं लग्नाच्या स्वप्नात हरवलेली..! “कधी आपल्या डोक्यावरती अक्षदा पडणार” या विचारानं घराघरात व्याकुळता पसरली आहे. पण काय करणार... ही सगळी परिस्थिती निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरलाय लाल रक्ताला चटावलेला बिबट्या.. या बिबट्यामुळे गावागावात दहशत पसरलीय. परिणामी या तरुणांच्या “गुलाबी स्वप्नांचाही” फडशा पाडला गेलाय.
हे धक्कादायक वास्तव्य आहे... पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांमधील गावांचं..बिबट्याच्या दहशतीखाली जगणाऱ्या या भागातील ग्रामस्थ आता रोज भीतीच्या सावलीत दिवस काढत आहेत. केवळ बिबट्याच्या भितीमुळे या भागातील तरुणांची संसाराची स्वप्नं रखडली आहेत. मुलींचे आई-वडील आपल्या पोटच्या गोळ्याला या परिसरात देण्यास तयार नाही. सोयरीक जोडण्यास स्पष्ट नकार मिळत असल्याने शेकडो तरुण आजही अविवाहित राहिले आहेत.
बिबट्याच्या या भीतीमुळे सुट्टीच्या दिवसात मामाचं गावही नको रे, अशी वेळ लाडक्या भाचे-भाच्यांवर आली आहे.गावोगाव शेतशिवारात झुंडीने फिरणाऱ्या बिबट्यांच्या टोळीने अनेक वेळा पशुधनावर हल्ले केले. कित्येक जणांचे प्राण गेले आणि आता सामाजिक आयुष्यावरही त्याचा खोल परिणाम दिसू लागलाय.
गावातील अनेक तरुण शिक्षण घेतलेले आहे, नोकरीला लागलेले आहेत, सेटल आहे पण तरीही बिबट्याच्या दहशतीमुळे त्यांची लग्नं होऊ शकत नाही.पालकांच्या चिंता वाढल्या आहेत..त्यामुळे या भागातील नागरिक आता बिबट्याचा बंदोबस्त कधी होणार आणि या रखडलेल्या लग्नांना शुभमुहूर्त कधी लागणार? असा प्रश्न विचारताना दिसत आहेत.