leopard attack :ओतूर रहाटीमळा येथे बिबट्याचा हल्ला; शेतकऱ्यास गंभीर दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:44 IST2025-12-16T17:42:48+5:302025-12-16T17:44:35+5:30
दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर उडी मारून हल्ला केला. बिबट्याने त्यांच्या डाव्या पायावर हल्ला केला

leopard attack :ओतूर रहाटीमळा येथे बिबट्याचा हल्ला; शेतकऱ्यास गंभीर दुखापत
ओतूर : ओतूर येथील रहाटीमळा परिसरात मंगळवार सायंकाळी ४.२५ सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात विनोद बबन चौरे (वय ४८) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अधिकच्या माहितीनुसार, विनोद चौरे हे मांडवी नदीच्या काठावर असलेली आपली विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर उडी मारून हल्ला केला. बिबट्याने त्यांच्या डाव्या पायावर हल्ला केला असून चार दात थेट मांडीमध्ये रुतल्याने ते गंभीर जखमी झाले. चौरे यांनी जोरात आरडाओरडा करताच बिबट्याने घटनास्थळावरून धूम ठोकली.
या घटनेची माहिती मिळताच ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विश्वनाथ बेले व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी चौरे यांना ओतूर येथे प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारांसाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, परिसरात बिबट्याच्या हालचाली वाढल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.