राहू: दहिटणे (ता.दौंड) नजीकच्या बापूजीबुवा वस्ती येथे मेंढपाळ धुळा भिसे यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर कुटुंब गाढ झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवून ११ महिन्याच्या लहान मुलाला उचलून नेल्याची घटना घडली आहे. अनवित धुळा भिसे (वय - अकरा महिने) असे लहान मुलाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मेंढपाळ धुळाजी भिसे यांचा मेंढ्यांंचा वाडा दोनचार दिवसांपासून परिसरात मुक्कामी आहे. मंगळवारी दिवसभर मेंढ्यांना चारून आल्यानंतर अगदी दमलेल्या अवस्थेत साखर झोपेत कुटुंब होते. मध्यरात्री बिबट्याने हल्ला चढवून अकरा महिन्याच्या चिमुरड्याला उचलून नेले आहे. घटनास्थळी रेस्क्यू टीमसह श्वान पथक पाचरण करण्यात आले असून सर्वत्र शोध मोहीम चालू आहे. परंतु अद्याप देखील लहान मुलाचा शोध लागला नाही. राहूबेट परीसरातील विविध गावांमध्ये ग्रामस्थांना राजरोसपणे बिबट्याचे दर्शन होत असून परीसरामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याने उच्छाद मांडला आहे. नागरिकांच्या घराजवळ रात्री-अपरात्री बिबट्याचा वावर असल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दौंड तालुक्यात बिबट्याचा उच्छाद; मेंढ्यांच्या वाड्यावर हल्ला; ११ महिन्यांच्या बाळाला उचलून नेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:54 IST