Video : जुन्नरमध्ये मादी बिबट्या जखमी अवस्थेत सापडली; वनविभागाने सुरक्षित ताब्यात घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 17:35 IST2026-03-01T17:29:00+5:302026-03-01T17:35:10+5:30
पशुवैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षित ताब्यात घेण्यात आले व पुढील उपचारासाठी माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलविण्यात आले.

Video : जुन्नरमध्ये मादी बिबट्या जखमी अवस्थेत सापडली; वनविभागाने सुरक्षित ताब्यात घेतले
ओतूर (ता. जुन्नर) – खामुंडी गावातील बदगी-बेलापूर रस्त्यालगत एका शेतात जखमी अवस्थेत मादी बिबट्या आढळल्याची घटना रविवारी (१ मार्च) सकाळी घडली. सुभाष भिमाजी बोडके यांच्या गट क्रमांक ८० मधील शेतात सकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
जुन्नरमध्ये मादी बिबट्या जखमी अवस्थेत सापडली; वनविभागाने सुरक्षित ताब्यात घेतले #pune#leopardpic.twitter.com/HBOZ3vHzg2
— Lokmat (@lokmat) March 1, 2026
घटनेची माहिती मिळताच वनरक्षक व्ही. ए. बेले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चैतन्य कांबळे यांना कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल-वनरक्षक कर्मचारी, आळे व नगदवाडी येथील रेस्क्यू पथक तसेच माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथील डॉक्टर आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षित ताब्यात घेण्यात आले व पुढील उपचारासाठी माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलविण्यात आले.
डॉ. श्रीराम यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मादी बिबट्याचे वय अंदाजे दीड वर्ष असून, गेल्या तीन-चार दिवसांपासून भक्ष न मिळाल्यामुळे ती अशक्त झाली असावी व त्यामुळे ती शेतात कोसळली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. ही संपूर्ण रेस्क्यू कारवाई सहाय्यक वनसंरक्षक राजहंस मॅडम आणि प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. परिसरातील नागरिकांनी वनविभागाच्या तत्पर आणि संवेदनशील कार्यवाहीचे कौतुक केले.