Pune News | राजुरी येथे बिबट्याचे हल्लासत्र सुरूच, शेळी ठार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 19:02 IST2023-03-23T19:00:43+5:302023-03-23T19:02:56+5:30
दिवसाढवळ्या बिबटे पाळीव प्राण्यांवर प्राणघातक हल्ले करत आहेत...

Pune News | राजुरी येथे बिबट्याचे हल्लासत्र सुरूच, शेळी ठार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
राजुरी (पुणे) : जुन्नर तालुक्यातील राजुरी उंचखडक परिसरात गेले काही वर्षे बिबट्या सतत धुमाकूळ घालत आहे. या ठिकाणी प्रत्येक विभागात बिबट्याचा संचार आहे. बिबट्याची खूप मोठी दहशत या भागात पसरली असून, दिवसाढवळ्या बिबटे पाळीव प्राण्यांवर प्राणघातक हल्ले करत आहेत.
येथील खराडी मळ्यातील मंगेश गोपीनाथ औटी यांच्या शेतावर मेंढपाळांचा वाडा मुक्कामी होता. रात्रीच्या सुमारास बिबट्याने या वाड्यावर हल्ला करून वाड्यातील एका शेळीला पकडून फरपटत नेले. मेंढीचा आवाज ऐकून मेंढपाळ जागा होऊन आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने तेथून पलायन केले; परंतु शेळी मात्र जागेवरच ठार झाली होती.
मेंढपाळ व्यावसायिकाचे सुमारे दहा हजार रुपयांपर्यंत नुकसान झाले. या ठिकाणीच तीन ते चार बिबटे पाहिल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. नुकसान झालेल्या गरीब कुटुंबाला त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे.