धीरज घाटेंच्या कार्यालयातील वीजचोरी प्रकरणात महावितरण,मनपासह पोलिस आयुक्तांना कायदेशीर नोटीस
By नम्रता फडणीस | Updated: June 19, 2025 19:33 IST2025-06-19T19:33:10+5:302025-06-19T19:33:20+5:30
सामान्य माणसाने ५०० रुपये नाही वेळेवर भरले, तर वीज तोडणारे महावितरणचे अधिकारी या विषयात गेली १२ वर्षे शांत का आहेत ? त्यांना भ्रष्टाचाराचा काही वाटा जातो का?

धीरज घाटेंच्या कार्यालयातील वीजचोरी प्रकरणात महावितरण,मनपासह पोलिस आयुक्तांना कायदेशीर नोटीस
पुणे : भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या सानेगुरुजी नगर येथील कार्यालयात २०१२ पासून बेकायदेशीर वीजचोरी झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, सामाजिक कार्यकर्ते सागर धाडवे यांच्या वतीने वकील असीम सरोदे यांच्या मार्फत महावितरण, मनपा अधिकारी व पोलिस आयुक्त यांस कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
महापालिकेच्या मालकीच्या मालमत्तेवर २०११ पासून अतिक्रमण करून धीरज घाटे व मनीषा घाटे यांच्या खासगी पक्ष कार्यालयात वीज मीटर नसताना थेट कनेक्शनद्वारे वीज वापर केला जात असल्याचे २६ एप्रिल २०२५ च्या महावितरणच्या स्थळ पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. माजी नगरसेवक धीरज घाटे, माजी नगरसेविका मनीषा घाटे व मनपा वीज वितरण आणि मालमत्ता विभागातील संबंधित अधिकारी यांनी संगनमताने शासकीय मालमत्तेचा बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
आरटीआयअंतर्गत मिळालेली माहिती, गुगल इमेजेस, स्थळ पाहणी अहवाल, वीज बिलाच्या पावत्या व नकाशा अशा विविध दस्तऐवजांच्या आधारे वीजचोरी सिद्ध झाली आहे. धीरज घाटे यांचे कार्यालय, व्यायामशाळेतील एअर कंडीशनर, ट्रेड मिल व विविध उपकरणांमुळे लोड १० किलोवॅटहून अधिक असूनही अहवालात कमी लोड दाखवून कारवाई टाळण्यात आली आहे.
या नोटीसमध्ये धीरज घाटे व मनीषा घाटे यांच्याविरोधात विद्युत कायदा १३५ नुसार गुन्हा नोंदवण्याची, २०१२ पासूनचा वीज वापराचा दंड वसूल करण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीसह भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार विरोधी कायद्यानुसारही कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
कार्यकर्ते सागर धाडवे म्हणाले की, सामान्य माणसाने ५०० रुपये नाही वेळेवर भरले, तर वीज तोडणारे महावितरणचे अधिकारी या विषयात गेली १२ वर्षे शांत का आहेत ? त्यांना भ्रष्टाचाराचा काही वाटा जातो का? या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी पोलिसांत तक्रार केली आहे. नुकत्याच नाना पेठ येथील कलम १३५ अंतर्गत वीजचोरीप्रकरणी शिवम आंदेकर यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, मग तोच नियम भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना लागू नाही का ? असा सवालही त्यांनी केला आहे.