यवत : राज्य शासनाने पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन प्रक्रिया सुरू केली असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच विमानतळ उभारणीचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ते सोलापूर दौऱ्यावरून परत जात असताना कासुर्डी ( ता. दौंड) येथे ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी सरपंच धनश्री विशाल टेकवडे व युवा उद्योजक वाल्मिक आखाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मोहोळ म्हणाले, “पुरंदर विमानतळ पुणे आणि परिसराच्या विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. राज्य शासनाने यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार योग्य मोबदला मिळावा यासाठी त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. येत्या सहा महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.”
मोहोळ पुढे म्हणाले, नवी मुंबई विमानतळ पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर उभारण्यात आला. पुरंदर विमानतळ कोणत्या तत्त्वावर उभारायचा याचा निर्णय जमीन संपादन पूर्ण झाल्यानंतर घेतला जाईल. हडपसर ते यवत सहापदरी रस्ता व उन्नत मार्गाच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे अधिग्रहण करताना दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांना समान न्याय मिळावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी यावेळी मोहोळ यांच्याकडे केली.