लाडकी बहिण योजना राज्यात सर्वदूर पोहचणार; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांवर सोपवली जबाबदारी

By राजू इनामदार | Published: July 10, 2024 05:40 PM2024-07-10T17:40:23+5:302024-07-10T17:41:25+5:30

विधानसभा निवडणुकीच्या आधी या सर्व योजना लोकापर्यंत सविस्तर माहितीसह पोहचल्या पाहिजेत असे या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे

ladaki bahin yojana will reach far and wide in the maharashtra state ajit pawar entrusted the responsibility to the office bearers | लाडकी बहिण योजना राज्यात सर्वदूर पोहचणार; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांवर सोपवली जबाबदारी

लाडकी बहिण योजना राज्यात सर्वदूर पोहचणार; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांवर सोपवली जबाबदारी

पुणे: अंदाजपत्रकातील बहुचर्चित लाडकी बहिण व अन्य योजना राज्यात सर्वदूर पोहचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) मोहिम सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका भरून काढण्यासाठी पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या मोहिमेची आखणी करून दिली आहे. त्यानुसार पक्षाचे प्रवक्ते तसेच अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांना जिल्हे नियुक्त करून देण्यात आले असून तिथे जाऊन त्यांनी अंदाजपत्रकातील योजनांचा प्रसार व प्रचारही करायचा आहे.

पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांची या योजनेनुसार बुधवारी सकाळी पुण्यात पत्रकार परिषद झाली. त्यात त्यांनी लाडकी बहिण योजनेबरोबरच अजित पवार यांनी अंदाजपत्रकात मांडलेल्या अन्य योजनांचीही विस्ताराने माहिती दिली. तत्पुर्वी पक्ष पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत त्यांनी पुणे शहर व जिल्ह्यात या योजनांची माहिती लोकापर्यंत पोहचवण्याच्या सुचना दिल्या. त्यासाठी स्थानिक स्तरावर मेळावा, लहान बैठका, महिला बचत गट यांचे साह्य घेण्याविषयी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या आधी या सर्व योजना लोकापर्यंत सविस्तर माहितीसह पोहचल्या पाहिजेत असे या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. आवश्यक असल्यास त्यासाठी माहितीपत्रक छापून घ्यावे असेही सांगण्यात आले आहे.

मुंबईसाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे जबाबदारी आहे. वैशाली नागवडे सोलापूर जिल्हा, सुरेश चव्हाण- छत्रपती संभाजीनगर, आनंद परांजपे नाशिक याप्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचे प्रवक्ते तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. दरमहा दीड हजार रूपयांची मदत देणाऱ्या लाडकी बहिण योजनेची राज्यात बरीच चर्चा आहे. मध्यप्रदेशच्या धर्तीवर ही योजना जाहीर करण्यात आली. त्यासाठी अजित पवार यांनी अंदाजपत्रकात तब्बल २५ हजार कोटी रूपयांची तरतुद केली आहे. चर्चा असली तरी योजनेच्या अटी, निकष, मुदत याबबात विशेष माहिती नाही, ती करून द्यावी असे सांगण्यात आले आहे. 

पक्षसंघटनेचा सहभाग घेणार

सरकारी योजनांचा सरकारी यंत्रणेकडून अपेक्षित प्रसार होत नाही. योजनेसाठी पात्र असणाऱ्यांनाच योजनेची माहिती नसते. पक्ष संघटनेच्या माध्यमातून ही त्रुटी दूर व्हावी यासाठी ही मोहिम आहे. त्यानुसारच मी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषद व स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. उमेश पाटील- मुख्य प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

Web Title: ladaki bahin yojana will reach far and wide in the maharashtra state ajit pawar entrusted the responsibility to the office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.