वाकडेवाडी बसस्थानकावर महिला सुरक्षेचा अभाव, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता, पोलिसही नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:41 IST2025-03-01T16:40:54+5:302025-03-01T16:41:41+5:30

संध्याकाळनंतर किंवा पहाटेच्या वेळी त्यांना असुरक्षित वाटते, काही ठिकाणी बसस्थानकांत पुरेशी प्रकाश व्यवस्थाही नाही, महिलांच्या प्रतिक्रिया

Lack of women security lack of CCTV camera no police at Wakdewadi bus stand | वाकडेवाडी बसस्थानकावर महिला सुरक्षेचा अभाव, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता, पोलिसही नाहीत

वाकडेवाडी बसस्थानकावर महिला सुरक्षेचा अभाव, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता, पोलिसही नाहीत

पुणे : शुक्रवारी दुपारी तीनची वेळ... शिवाजीनगर (वाकडेवाडी) बसस्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी तशी कमीच होती. खुर्च्यांवर काही प्रवासी बसलेले, काही जण बसची वाट पाहत थांबलेले होते. दोन्ही गेटवर दोन-दोन सुरक्षारक्षक होते. परंतु प्रवासी संख्येच्या तुलनेत सुरक्षारक्षकांची संख्या कमी असल्याचे दिसून आले. शिवाय गेटच्या दोन्ही बाजूला रिक्षांच्या रांगा लागल्या होत्या. महत्त्वाच्या आणि व्यस्त बसस्थानकांपैकी एक असलेल्या वाकडेवाडी बसस्थानकावर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक त्रुटी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने केलेल्या निरीक्षणात आढळले.

स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी पहाटेच्या सुमारास तरुणीवर बसमध्ये बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर एसटी प्रशासन खडबडून जागे झाले. एसटीची सुरक्षाव्यवस्था बदलण्याचे आदेश आले. एवढी गंभीर घटना घडलेली असताना जवळच असलेल्या शिवाजीनगर बसस्थानकात महिला सुरक्षेच्या दृष्टीने सुविधांचा अभाव दिसून आला. महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे मत, स्थानकावरून प्रवास करणाऱ्या अनेक महिला प्रवाशांनी व्यक्त केले.

महिला स्वच्छतागृहातील दयनीय स्थिती

स्वच्छतागृह कोपऱ्यात आहे. येथे सॅनिटरी नॅपकिन इनसिनिरेटर मशिन गंजलेल्या आणि अस्वच्छ स्थितीत आहेत. मशिनच्या वर पाण्याची रिकामी प्लास्टिक बाटली ठेवलेली असून, आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. सिमेंटच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बॅग्स आणि इतर वस्तू अस्ताव्यस्तपणे ठेवलेल्या आहेत. महिला प्रवाशांसाठी शौचालये ही केवळ सुविधा नसून, ती आरोग्याशी संबंधित गरज आहे. त्यामुळे अशा सार्वजनिक ठिकाणी अधिक स्वच्छता आणि उत्तम व्यवस्थापनाची नितांत गरज आहे. प्रशासनाने यावर त्वरित पावले उचलावीत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता

बसस्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली असून, ती प्रवाशांसाठी असुरक्षित ठरत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी या झाडांमुळे अंधार पसरल्याने महिलांना असुरक्षित वाटते. आतील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत, परंतु संख्या कमी आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास ती नोंदवणेही कठीण जाणार आहे. प्रशासनाने येथे तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची गरज आहे.

वाहनतळ नसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड

शिवाजीनगर बसस्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या ३० ते ४० हजारांच्या घरात आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्यांना सोडण्यासाठी आणि आलेल्यांना घेऊन जाण्यासाठी नागरिक दुचाकी, चारचाकी वाहन घेऊन येतात. परंतु या ठिकाणी स्वतंत्र वाहनतळ नसल्यामुळे झाडाखाली वाहने लावावी लागतात. दरम्यान, या ठिकाणी गाडी लावल्यावर वाहतूक पोलिसांकडून वाहन उचलून घेऊन जातात. त्यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे स्वतंत्र वाहनतळ तयार करणे आवश्यक आहे.

महिला स्वच्छतागृहात पुरुष कर्मचारी

स्थानकावरील महिला स्वच्छतागृहात पुरुष कर्मचारी कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे महिला प्रवाशांना अस्वस्थ वाटते आणि तेथील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते. महिला प्रवाशांसाठी स्वच्छतागृहात केवळ महिला कर्मचारी असाव्यात.

महिला सुरक्षारक्षक नाहीत

महिला प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा व्यवस्थापन उपलब्ध नाही. स्थानकावर महिला सुरक्षारक्षक नसल्याने महिला प्रवाशांना कोणतीही समस्या उद्भवल्यास मदत मिळणे कठीण जाते. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा गर्दीच्या वेळी महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे गरजेचे आहे.

महिला प्रवाशांच्या या आहेत मागण्या

-महिला स्वच्छतागृहात केवळ महिला कर्मचारी असाव्यात.

-स्थानकावर बसण्याची योग्य सुविधा उपलब्ध करावी.

-संपूर्ण बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.

-स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी.
-महिला सुरक्षारक्षकांची नियुक्ती त्वरित करण्यात यावी.

या आहेत समस्या

-पुरेशी सुरक्षा नाही, अनेक बसस्थानकांवर महिला सुरक्षारक्षक किंवा पोलिस बंदोबस्त नसतो.

-बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतात किंवा त्यांची निगा राखली जात नाही.

-प्रकाशझोताचा अभाव कमी असल्यामुळे बसस्थानकांवर रात्रीच्या वेळी प्रकाश अपुरा असल्याने महिलांना असुरक्षित वाटते.

-महिला प्रतीक्षालये आणि सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता समाधानकारक नाही.

-तक्रारी नोंदवण्यासाठी आणि आपत्कालीन मदतीसाठी कोणतेही विशेष हेल्पडेस्क किंवा मदत क्रमांक कार्यरत नसतात.

शहर आणि ग्रामीण भागांतून येणाऱ्या अनेक महिला प्रवाशांसाठी एसटी बस ही प्रवासाचा मुख्य आधार आहे. मात्र, संध्याकाळनंतर किंवा पहाटेच्या वेळी त्यांना असुरक्षित वाटते. काही ठिकाणी बसस्थानकांत पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही. -भक्ती गुजर, प्रवासी

रात्री प्रवास करताना भीती वाटते. सुरक्षारक्षक दिसत नाहीत. काही ठिकाणी स्थानकांची स्थिती खराब आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह अस्वच्छ असतात. त्यामुळे महिलांना मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे सुरक्षेसाठी महिला पोलिस किंवा अधिक सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे. -रेणुका साळुंखे, प्रवासी
 

Web Title: Lack of women security lack of CCTV camera no police at Wakdewadi bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.