पुणे शहरात गिअरच्या सायकलींचा मोठा तुटवडा ; दोन महिन्यानंतरही ग्राहक 'वेटिंग' वरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 12:40 IST2020-10-20T12:38:26+5:302020-10-20T12:40:23+5:30
जगात चीननंतर भारतात सायकलींचे जास्त उत्पादन होते. तसेच सायकल वापरणाऱ्यांचे प्रमाणही खुप मोठे आहे..

पुणे शहरात गिअरच्या सायकलींचा मोठा तुटवडा ; दोन महिन्यानंतरही ग्राहक 'वेटिंग' वरच
पुणे : लॉकडाऊन काळात नागरिकांमध्ये व्यायामाचे महत्व वाढू लागल्यानंतर सायकलींच्या मागणीतही काहीशी वाढ झाली. पण सध्या उत्पादन कमी होत असल्याने पुण्यात गिअरच्या सायकलींचा तुटवडा जाणवत आहे. कंपन्यांकडे मागणी करून दोन महिने झाले तरी सायकली मिळत नाहीत. प्रामुख्याने चीनमधून सायकली व सुट्टे भाग येत असल्याने त्यावर परिणाम झाल्याचे सायकल विक्रेत्यांनी सांगितले.
जगात चीननंतर भारतात सायकलींचे जास्त उत्पादन होते. तसेच सायकल वापरणाऱ्यांचे प्रमाणही खुप मोठे आहे. लॉकडाऊनमध्ये त्यावर विपरीत परिणाम झाला. पण या कालावधीत व्यायामशाळा बंद असल्याने अनेकांनी सायकलींना प्राधान्य देण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी शारीरिक क्षमता वाढविणे गरजेचे असल्याने लोकांमध्ये व्यायामाचे महत्व वाढले असून त्याचा परिणाम सायकलींच्या मागणीवरही झाला आहे. पण विक्रेत्यांना कंपन्यांकडून पुरेशा सायकली मिळत नसल्याची स्थिती आहे.
पुण्यामध्ये प्रामुख्याने गिअर असलेल्या सायकलींचा तुटवडा जाणवत आहे. उत्पादक कंपन्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. तसेच चीनमधून येणाºया मालावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादन घटल्याने विक्रेत्यांना सायकली वेळेत भेटत नाहीत. काही विक्रेत्यांनी एक-दोन महिन्यांपासून मागणी करूनही सायकली मिळालेल्या नाहीत. लॉकडाऊनपुर्वी दररोज सर्वप्रकारच्या १०० ते १२५ सायकलींची विक्री होत होती. हा आकडा सध्या ५० ते ६० च्या घरात आहे. अनेक विक्रेत्यांना मागणीप्रमाणे सायकली मिळत नसल्याने ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत.
---------------
माझ्याकडे सध्या ३० ते ४० ग्राहकांची गिअर सायकलींची मागणी आहे. पण मागील एक-दोन महिन्यांत एकही सायकल मिळालेली नाही. प्रामुख्याने चीनमधून येणारे सुट्टे भाग कमी झाले आहेत. मनुष्यबळही पुरसे नाही. कच्च्या मालाच्या किंमतीही वाढल्या आहेत. परिणामी उत्पादान ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाल्याचे दिसते.
- बाबा कुलकर्णी, अध्यक्ष, पुणे सायकल डिलर्स असोसिएशन
------------
पुणे शहर हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे. पण मागील काही वर्षांत हे शहर दुचाकींचे झाले आहे. सायकलींना मागणी होती त्यावेळी डिलर्स असोसिएशनचे सुमारे ५ हजार सदस्य होते. आता हा आकडा ५० ते ६० पर्यंत खाली आला आहे. पुण्याचा पसाराही खुप वाढल्याने सायकलने प्रवास करणे शक्य होत नाही. गिअर सायकलींचा वापर व्यायामासाठी वाढत आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
----------------
लॉकडाऊननंतर व्यायामासाठी गिअर सायकलींना मागणी वाढली आहे. प्रामुख्याने २४ व २६ इंची सायकलींची मागणी आहे. पण उत्पादन कमी असल्याने लवकर मिळत नाहीत.
- अमित मेहता, पुना सायकल मार्ट