Pune Police: सराईत गुन्हेगारांची ‘कुंडली’च ओपन; १८ ठिकाणी सर्वाधिक वास्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 01:34 PM2024-04-02T13:34:53+5:302024-04-02T13:35:14+5:30

गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईतांवर ठेवणार अंकुश...

'Kundli' of Sarait criminals open; 18 are the most frequented places pune crime | Pune Police: सराईत गुन्हेगारांची ‘कुंडली’च ओपन; १८ ठिकाणी सर्वाधिक वास्तव्य

Pune Police: सराईत गुन्हेगारांची ‘कुंडली’च ओपन; १८ ठिकाणी सर्वाधिक वास्तव्य

पुणे : सराईत गुन्हेगार वास्तव्यास असलेली शहरातील अठरा ठिकाणे पोलिसांनी शोधून काढली आहेत. गुन्हे शाखेकडून ही कुंडली तयार करण्यात आली आहे. परिमंडळ तीन, चार, पाच आणि दोनच्या हद्दीत सर्वाधिक सराईत गुन्हेगार राहत असल्याचे आढळून आले आहे. या ठिकाणी एकाचवेळी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईतांवर अंकुश ठेवणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली.

गुन्हेगारांचे वास्तव्य असलेल्या संपूर्ण परिसराची मॅपिंग करून हे हॉटस्पॉट पोलिसांनी निश्चित केले आहेत. त्यासाठी मागील काही महिन्यांपासून काम सुरू होते. वाढत्या गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांकडून विविध उपायोजना करण्यात येत आहेत. त्याचाच हा एक भाग आहे. यामध्ये बेकायदा शस्त्र बाळगणे, अल्पवयीन गुन्हेगार, अवैध धंदेवाले, वाहनचोरी, अमली पदार्थ तस्करी, तडीपार, तोडफोड करणारी टोळकी, टायर, पेट्रोलचोरी, जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांबरोबर भुरट्या चोरट्यांना आयडेंटीफाय करण्यात आले आहे.

त्यानुसार पोलिसांचे आता या परिसरात विशेष लक्ष असणार आहे. प्रामुख्याने गुन्हे शाखेने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुन्हे शाखेचे सर्व युनिट एकाचवेळी या परिसरात स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन पूर्ण ताकदीने कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईतांची झाडाझडती घेणार आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहन तोडफोडीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. त्यांना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत. तोडफोड होणारी ठिकाणे शोधण्याबरोबरच शहरात तोडफोड करणारी टोळकी पोलिसांनी शोधून काढली असून, त्यांची वास्तव्याची ठिकाणे रडारवर घेतली आहेत. त्यामुळे भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते. दोन टप्प्यात हे ऑपरेशन राबवण्यात येणार असून, शोधण्यात आलेली ही १८ मोठी ठिकाणे पहिल्या टप्प्यातील आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात छोटी ठिकाणे शोधून, त्याबाबत उपायोजना करण्यात येणार असल्याचे बलकवडे यांनी सांगितले. ही ठिकाणे शोधून काढत असताना, पोलिसांना जबरी चाेऱ्यांमध्ये तरुण आणि भुरटे चोरटे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामधील बहुतांश आरोपी हे स्थानिक आहेत. दरोडा, दरोड्याची तयारी अशा गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचादेखील समावेश असल्याचे पुढे आले आहे. त्याच-त्याच परिसरात ही टोळकी गुन्हे करत आहेत. पोलिस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे या अधिकाऱ्यांचे या हॉटस्पॉट ऑपरेशनवर विशेष लक्ष असणार आहे.

अल्पवयीन गुन्हेगारांवर लक्ष...

गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान असून, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. हॉटस्पॉट आयडेंटीफाय करताना पोलिसांनी याबाबत लक्ष केंद्रित केले आहे. तोडफोड, जबरी चोरी, वाहनचोरी अशा गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

परिमंडळ आणि गुन्हेगारांचे हॉटस्पॉट

परिमंडळ १ - ०२

परिमंडळ २ - ०३

परिमंडळ ३ - ०४

परिमंडळ ४ - ०५

परिमंडळ ५ - ०४

शहरात गुन्हेगारांचे वास्तव्य असलेली अठरा ठिकाणे गुन्हे शाखेकडून शोधून काढण्यात आली आहेत. त्या परिसराचे मॅपिंग करून ही कुंडली तयार करण्यात आली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील.

- शैलेश बलकवडे, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे

Web Title: 'Kundli' of Sarait criminals open; 18 are the most frequented places pune crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.