पैसे वसुलीसाठी तरुणाचे अपहरण; तिघांना अटक, तरुणाची सुटका

By विवेक भुसे | Published: February 12, 2024 03:55 PM2024-02-12T15:55:44+5:302024-02-12T16:18:42+5:30

पोलिसांनी तरुणाची माळशिरस येथून सुटका केली

Kidnapping of youth for extortion Three arrested youth released | पैसे वसुलीसाठी तरुणाचे अपहरण; तिघांना अटक, तरुणाची सुटका

पैसे वसुलीसाठी तरुणाचे अपहरण; तिघांना अटक, तरुणाची सुटका

पुणे : पैसे परत न केल्याने चौघांनी उंड्रीमधून एका तरुणाचे अपहरण केले. कोंढवा पोलिसांनी त्याचा शोध घेऊन माळशिरस येथून त्याची सुटका केली.  अपहरण करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. सुरज राजेंद्र मोरे (रा. कात्रज), विक्रमसिंग लक्ष्मणराव पाटील आणि प्रसाद कुलकर्णी (दोघे रा. माळशिरस) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत माधुरी घनश्याम मोरे (वय ३१, रा. गोदरेज ग्रीन्स, उंड्री) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती अमित आप्पासो चव्हाण (वय ३२) यांनी वसुधा तुकाराम जगताप यांच्याकडून पैसे घेतले होते. ते अनेक दिवस परत न केल्याने त्यांच्यात वादविवाद होत होते. सुरज मोरे व त्याचे तीन साथीदार १० फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांच्या घरी आले. त्यांनी अमित यांना बाहेर बोलावले. त्यांचे कारमधून अपहरण केले. हा प्रकार पाहून माधुरी मोरे यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिली.

कोंढवा पोलिसांनी तातडीने याची दखल घेऊन तपास सुरु केला. तेव्हा अमित मोरे यांना लातूर येथील एका पत्र्याचे खोलीत डांबून ठेवल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथक तातडीने रवाना झाले. तोपर्यंत अपहरणकर्त्यांनी त्यांना माळशिरस येथे नेले होते. पोलिसांनी तेथे त्यांचा शोध घेऊन मोरे यांची सुटका केली व तिघा अपहरणकर्त्यांना अटक केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे, पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, पोलीस हवालदार सतीश चव्हाण, सुजित मदन, लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने केली.

Web Title: Kidnapping of youth for extortion Three arrested youth released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.