‘किबे लक्ष्मी थिएटर’(प्रभात टॉकीज) बंद होण्याची शक्यता; थिएटर पुढे न चालविण्याचा मालकांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 06:43 PM2021-10-25T18:43:37+5:302021-10-25T18:43:51+5:30

मराठी चित्रपटांच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार ठरलेले ‘किबे लक्ष्मी थिएटर’ (पूर्वीचे ‘प्रभात’) यापुढील काळात न चालविण्याचा ठाम निर्णय मालकांनी घेतला आहे

‘Kibe Lakshmi Theater’ (Prabhat Talkies) likely to close the decision of the owners not to run the theater further | ‘किबे लक्ष्मी थिएटर’(प्रभात टॉकीज) बंद होण्याची शक्यता; थिएटर पुढे न चालविण्याचा मालकांचा निर्णय

‘किबे लक्ष्मी थिएटर’(प्रभात टॉकीज) बंद होण्याची शक्यता; थिएटर पुढे न चालविण्याचा मालकांचा निर्णय

Next

नम्रता फडणीस

पुणे : मराठी चित्रपटांच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार ठरलेले ‘किबे लक्ष्मी थिएटर’ (पूर्वीचे ‘प्रभात’) यापुढील काळात न चालविण्याचा ठाम निर्णय मालकांनी घेतला आहे. हे थिएटर कायमस्वरूपी बंद करण्याचे अथवा पुनश्च दुस-याला करारतत्वानुसार चालवायला दिले जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे  प्रदीर्घ कालखंडानंतर जरी चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेने पुन्हा सुरू झाली असली तरी मराठी चित्रपटांच्या पाऊलखुणा जपलेल्या कलाकारांच्या या लाडक्या थिएटरचा पडदा पुढील काही काळ बंदच राहणार आहे.

इंदूरचे संस्थानिक रामचंद्र किबे यांनी आपली पत्नी लक्ष्मी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्रपटगृहाचे ’ किबे लक्ष्मी थिएटर’ असे नामकरण केले होते. मराठी चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवणा-या प्रभात फिल्म कंपनीच्या विष्णूपंत दामले, एस.फत्तेलाल, व्ही. शांताराम, केशवराव धायबर, सीताराम बी.कुलकर्णी या खंदया शिलेदारांनी हे चित्रपटगृह चालवण्याची जबाबदारी उचलली. प्रभात फिल्म कंपनीवरून या चित्रपटगृहाचे  ‘प्रभात’ असे नामकरण करण्यात आले. ’प्रभात’ भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक सोनेरी पान ठरले. प्रभात म्हटले की अयोध्येचा राजा, संत तुकाराम, रामशास्त्री, संत एकनाथ, माणूस, शेजारी अशा अनेक दर्जेदार कलाकृतींची श्रृंखला डोळ्यासमोर येते. या भागीदारांपैकी विष्णुपंत दामले यांचे नातू विवेक दामले यांनी काही काळ या चित्रपटगृहाचे व्यवस्थापन सांभाळले. 

परंतु, चित्रपटगृहाच्या कराराची मुदत संपुष्टात आल्यामुळे हे चित्रपटगृह १० जानेवारी 2015 मध्ये त्यांनी सरदार किबे यांचे नातू अजय किबे यांच्याकडे हस्तांतरित केले. त्यानंतर हे  ‘किबे थिएटर’ सुरेश आणि अजय किबे या बंधूंनी चालवायला घेतले. सुरेश किबे हे पुण्यात वास्तव्यास असल्याने थिएटरच्या संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी तेच सांभाळत होते. परंतु दुर्देवाने तीन महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाल्याने हे थिएटर चालवायचे कसे? अशा प्रश्न अजय किबे यांना पडला आहे. त्यामुळे एकतर हे थिएटर कायमस्वरूपी बंद करायचे किंवा पुन्हा करारावर चालविण्यास द्यायचे? असे दोनच पर्याय त्यांच्यासमोर आहेत. याबाबत त्यांनी काही व्यक्तींशी बोलणी देखील सुरू केली आहेत. दुर्देवाने ’किबे थिएटर’ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविले गेलेले हे  ‘प्रभात पर्व’ काळाच्या पडद्याआड जाणार आहे.

भावाच्या निधनानंतर आम्ही हे चित्रपटगृह न चालविण्याचा आमचा पक्का निर्णय

''आम्ही विचार करीत होतोच कि हे चित्रपटगृह पुढे चालवायचे का नाही. पण आता भावाच्या निधनानंतर आम्ही हे चित्रपटगृह न चालविण्याचा पक्का निर्णय घेतला आहे. चित्रपटगृह कायमस्वरूपी बंद करायचे की कुणाला तरी चालवायचे द्यायचे याबाबत अजून काहीही नक्की केलेले नाही असे किबेचे मालक अजय किबे यांनी सांगितले.'' 

Web Title: ‘Kibe Lakshmi Theater’ (Prabhat Talkies) likely to close the decision of the owners not to run the theater further

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app