पाकिस्तानचा पूर्णपणे नायनाट केल्यावर पुढे दहशतवादी हल्ले होणार नाहीत, गनबोटे कुटुंबीयांची भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:38 IST2025-05-07T17:38:03+5:302025-05-07T17:38:57+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानविरुद्ध आणखी कडक कारवाई करतीलच यावर आमचा पूर्ण विश्वास आहे

पाकिस्तानचा पूर्णपणे नायनाट केल्यावर पुढे दहशतवादी हल्ले होणार नाहीत, गनबोटे कुटुंबीयांची भावना
पुणे : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागून जखमी झालेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेल्याने दोन्ही कुटुंबे अजूनही धक्क्यातच आहेत. अखेर भारतीय सैन्य दलाने या पत्नींना न्याय मिळवून दिला. आणि ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून संयुक्त कारवाई करत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. या ऑपरेशन सिंदूरचे कौस्तुभ गनबोटेंच्या पत्नी यांनी मोदींचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीपाकिस्तानविरुद्ध आणखी कडक कारवाई करतीलच यावर आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
सकाळीच उठल्यानंतर बातमी समजली की, पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे भारतीय सैन्याकडून उद्ध्वस्त करण्यात आले आहे. हे ऐकून मनाला शांतता मिळाली आणि खऱ्या अर्थाने सरकार मृत्यू झालेल्या २६ लोकांसोबत आहे याचे समाधान वाटले. परंतु पाकिस्तानचा पूर्णपणे नायनाट केला पाहिजे जेणेकरून पुढील दहशतवादी हल्ले होणार नाहीत. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावर कुणाल गनबोटे म्हणाला, पहलगाम हल्ल्याला पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे सरकार काय पावले उचलणार याकडे आमचे लक्ष लागून होते. परंतु देशाच्या पंतप्रधानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून महिलांना, बहिणींना खरच न्याय दिला आहे. हे नाव एकदम योग्यच आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानविरुद्ध आणखी कडक कारवाई करतीलच यावर त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.