कात्रज प्राणिसंग्रहालयाच्या तिकीट दरात वाढ होणार; उत्पन्ना पेक्षा खर्च अधिक असल्याचा प्रशासनाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 11:45 IST2025-11-14T11:45:24+5:302025-11-14T11:45:45+5:30
सध्या प्राणिसंग्रहालयाचा वार्षिक खर्च महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त असून पुढील काळात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे

कात्रज प्राणिसंग्रहालयाच्या तिकीट दरात वाढ होणार; उत्पन्ना पेक्षा खर्च अधिक असल्याचा प्रशासनाचा दावा
पुणे: महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेश शुल्कामध्ये (तिकीट दर) ५० टक्के वाढ होणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव उद्यान विभागाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. प्राणिसंग्रहालयातील उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
कात्रज येथे असलेले हे संग्रहालय पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे प्राणिसंग्रहालय आहे. त्यामुळे राज्यासह पुणे शहरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात या संग्रहालयास भेट देतात. महापालिकेकडून प्राणिसंग्रहालयाच्या विस्ताराचे काम सुरू आहे. या विस्तारीकरणानंतर झेब्रा, पिसोरी हरीण, लायन टेल्ड मकाक या नव्या प्रजातींसाठी प्रदर्शने उभारली जात असून मॉर्मोसेट, टॅमरिंन आणि रानकुत्रा या प्रजातींसाठी खंदक केले जाणार आहेत. तसेच नवीन सर्पोद्यानाची उभारणी तसेच नागरिकांसाठी आधुनिक सेवासुविधा वाढविण्याचे काम केले जाणार आहे.
सध्या प्राणिसंग्रहालयाचा वार्षिक खर्च महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त असून पुढील काळात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच भारतातील इतर प्राणिसंग्रहालयांच्या तुलनेत पुण्यातील प्राणिसंग्रहालयाचे तिकीट शुल्क कमी असल्याने ते वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये स्थायी समितीने दरवाढीस मंजुरी दिली होती. त्यानंतर गेल्या सात वर्षांत तिकीट शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती.
प्राणिसंग्रहालायाचे सध्याचे शुल्क व प्रस्तावित शुल्क
- प्रौढ (उंची ४ फूट ४ इंच व त्यापुढे) - सध्याचे शुल्क ४० रुपये, प्रस्तावित शुल्क ६० रुपये
- लहान मुले (उंची ४ फूट ४ इंचापर्यंत) (०३ वर्षांखालील मोफत ) - सध्याचे शुल्क १० रुपये, प्रस्तावित शुल्क २० रुपये.
- विदेशी नागरिक - सध्याचे शुल्क १०० रुपये, प्रस्तावित शुल्क १५० रुपये- अंध व अपंग - मोफत
- विद्यार्थी (शैक्षणिक सहल शिक्षकांसह)
अ) खासगी शाळांमधील विद्यार्थी - सध्याचे शुल्क १० रुपये, प्रस्तावित शुल्क २० रुपये
ब) महापालिका शाळा, जिल्हा परिषदा व शासकीय - सध्याचे शुल्क ०५ रुपये, प्रस्तावित शुल्क १० रुपये
- बॅटरी ऑपरेटेड वाहन सुविधा
अ ) प्रौढ (उंची ४ फूट ४ इंच व त्यापुढे) - सध्याचे शुल्क ४० रुपये, प्रस्तावित शुल्क ५० रुपये
ब) लहान मुले (उंची ४ फूट ४ इंचांपर्यंत) - सध्याचे शुल्क २५ रुपये, प्रस्तावित शुल्क ३० रुपये- कॅमेरा वापर सुविधा
अ) स्टील कॅमेरा - सध्याचे शुल्क ५० रुपये, प्रस्तावित शुल्क ५० रुपये
ब) व्हिडीओ कॅमेरा - सध्याचे शुल्क २०० रुपये, प्रस्तावित शुल्क २०० रुपये
- गाईड (उपलब्धतेनुसार प्रत्येक समूह) - सध्याचे शुल्क ५० रुपये, प्रस्तावित शुल्क ५० रुपये