- संतोष गाजरेपुणे : कात्रज : कात्रज परिसरामध्ये असणाऱ्या कात्रज-गुजरवाडी रस्त्यावरील साई इंडस्ट्रीयल एरियामधील भूषण एंटरप्रायझेस कंपनीत आग लागल्याची घटना मंगळवारी (दि.४) दुपारी चारदरम्यान घडली. घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाकडून गंगाधाम, कात्रज, कोंढवा बुद्रुक, पीएमआरडीए व ३ टँकर, तसेच दहा खासगी पाण्याचे टँकर दाखल होत आग आटोक्यात आणण्याचे काम उशिरापर्यंत युद्धपातळीवर सुरू होते. सदरील कंपनी ही मिरॅकल इलेक्ट्रिक बाइकचे ईव्ही बनवणारी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तेथे असणाऱ्या बॅटरीला मोठ्या प्रमाणात आग लागली. आग इतकी मोठी होती की धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत होते.
यामध्ये किमान २००० इलेक्ट्रिक बाइक बनविण्याचे साहित्य, तर जवळपास १५० इलेक्ट्रिक दुचाकी अर्धवट बनविलेल्या स्थितीत होत्या. त्या जळाल्या आहेत.
या आगीमध्ये कोणीही जखमी नाही, तर अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. अग्निशामक दलाचे सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, अग्निशामक केंद्र प्रमुख प्रदीप खेडेकर, सुभाष जाधव, प्रभाकर उम्राटकर, पंकज जगताप यांच्यासह अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसह भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुरक्षेचा प्रश्न...
या ठिकाणी आग लागल्यामुळे असणाऱ्या कंपन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पंधरा हजार चौरस फुटांमध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ही उत्पादन करणारी कंपनी आहे. दुचाकीचे सुटे स्पेअर पार्ट या ठिकाणी होते. मोठ्या प्रमाणात बॅटरीज व टायर, तसेच बाइक बनवण्याचे इतर साहित्य होते. दुपारी या कंपनीमध्ये ई-बाइक्स ठेवण्यासाठी आतमध्ये पत्र्याचे स्लॅब बनवण्यासाठी वेल्डिंगचे काम सुरू असताना आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कंपनीमध्ये आग नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही सक्षम अशी यंत्रणा नसल्याने आग मोठ्या प्रमाणात लागली. त्यामुळे फायर यंत्रणा कंपनीत का ठेवण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.