Kartiki Ekadashi 2022 : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरला विशेष रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 17:20 IST2022-11-02T17:17:00+5:302022-11-02T17:20:27+5:30
भाविकांसाठी कार्तिकी यात्रेनिमित्त विशेष गाड्या...

Kartiki Ekadashi 2022 : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरला विशेष रेल्वे
पुणे : कार्तिकी यात्रेनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे ये-जा करणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेऊन मध्य रेल्वेतर्फे लातूर-पंढरपूर, पंढरपूर-मिरज आणि सोलापूर-पंढरपुरदरम्यान विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे.
लातूर-पंढरपूर गाडी नं. ०१४१९ ही विशेष रेल्वे ४, ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी लातूर येथून सकाळी साडेसात वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी दुपारी साडेबाराच्या सुमारास पोहोचेल. गाडी नं. ०१४२० ही विशेष रेल्वे ४, ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथून दुुपारी अडीच वाजता सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास पोहोचेल. ही रेल्वे हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब रोड, येडशी, उस्मानाबाद, बार्शी टाउन, कुर्डुवाडी आणि मोडनिंब या रेल्वे स्थानकांवर थांबेल.
गाडी नं. ०१४२१ ही विशेष रेल्वे पंढरपूर येथून ५, ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी बारा वाजता पोहोचेल. गाडी नं. ०१४२२ ही विशेष रेल्वे मिरज येथून ५, ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी संध्याकाळी पाचच्या सुमारास पोहोचेल. ही रेल्वे सांगोला, वसूड, जावळे, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सुलगरे आणि आरग या रेल्वे स्थानकांवर थांबेल.
गाडी नं ०१४२३ ही डेमू १ ते ८ नोव्हेंबरपर्यंत दररोज सोलापूर येथून सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी दुपारी एक वाजता पोहोचेल. गाडी नं. ०१४२४ ही डेमू १ ते ८ नोव्हेंबरपर्यंत दररोज पंढरपूर येथून दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास पोहोचेल. ही रेल्वे बाळे, पाकणी, मुंढेवाडी, मोहोळ, मलिकपेठ, अनगर, वाकाव, माढा, वाडशिंगे, कुर्डुवाडी, मोडनिंब या स्थानकांवर थांबेल.