karnad's continuous 'theatre contact' in Pune | पुण्यात असायचा कार्नाड यांचा सातत्याने ‘रंगसंवाद’

पुण्यात असायचा कार्नाड यांचा सातत्याने ‘रंगसंवाद’

ठळक मुद्देपुण्यात सन १९७४- ७५ च्या दरम्यान फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष

पुणे: ‘कार्नाड गेले म्हणजे फक्त एक रंगधर्मीच गेला असे नाही तर परंपरेच्या माध्यमातून आधुनिकतेच्या साह्याने समकालीन राजकीय, सामाजिक स्थितीवर भाष्य करणारा एका चिकित्सक, विवेकी, जाणत्या विचारवंतालाच आपण मुकलो’ अशीच भावना कार्नाड यांच्या सहवासात आलेल्या बहुसंख्य रंगकर्मींनी व्यक्त केली. पुण्यात सन १९७४- ७५ च्या दरम्यान फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष होण्याच्याही आधीपासून त्यांचा पुण्यातील नाट्यक्षेत्रात धडपडणाऱ्या अनेकांबरोबर संपर्क होता. 
मोहन आगाशे ते अलिकडचे मोहित टाकळकर व्हाया समर नखाते, राजीव नाईक, प्रदीप वैद्य असा त्यांचा संवाद होता. साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान व विनोद दोषी फेस्टिवलचे संस्थापक सदस्य अशोक कुलकर्णी हे तर त्यांचे बेळगाव व नंतर मुंबईपासूनचे महाविद्यालयीन मित्र. ते पुण्यात स्थायिक झाल्यानंतर तर हा संवाद त्यांच्या माध्यमातून अधिकच वाढला. चित्रपट अभ्यासक समर नखाते हे त्यांचे एफटीआय मधील विद्यार्थी. ते म्हणाले, ‘‘माझी मुलाखतही त्यांनीच घेतली. त्यानंतर मी पदवी घेऊन बाहेर पडेपर्यंत तेच अध्यक्ष होते. पुराणकथांना आधुनिकतेचा साज देऊन ते वर्तमान स्थितीवर टोकदार असे भाष्य करत असत. त्यांच्यामुळे त्यावेळच्या अनेक मराठी रंगकर्मींना एका व्यापक संवेदनशीलतेबरोबर स्वत:ला जोडून घेता आले. त्यांनी त्यावेळी जे काही दिले ते कायमचे बरोबर राहिले.
मोहन आगाशे हेही त्यांचे सन १९७४ पासूनचे स्नेही. ते संचालक व कार्नाड अध्यक्ष असे एक वर्ष एफटीआय मध्ये झाले. आगाशे म्हणाले, ‘‘त्यावेळी मी दिवसा व रात्रीही त्यांच्याबरोबरच असायचो. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास कसा करता येईल, आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत कसे नेता येईल याचाच ते सातत्याने विचार करत असत. लोककथांचा वापर करण्याचे त्यांचे तंत्र फार प्रभावी ठरले. नाटक सिनेमा यातून त्यांनी दिग्दर्शनाबरोबरच अभिनयातही स्वत:ला आजमावून पाहिले.’’
प्रदीप वैद्य यांनी कार्नाडांच्या ‘बेंडाकाळू ऑन टोस्ट’ या नाटकाचे रुपांतर केले. बेंगळूरू या शहरासंबधीची एक आख्यायिका घेऊन त्यावर आता ते शहर कसे बकाल झाले आहे असा त्याचा आशय होता. वैद्य म्हणाले, ‘‘सुरूवातीला भाषांतर करायचे होते, मात्र नाटकाचा आशय लक्षात घेता आम्ही त्यांना ‘याच धर्तीवर पुणे शहर घेऊन रूपांतर करू का’ असे भीत भीत विचारले. तक्षणी त्यांनी होकार दिला. भारतातील सर्वच शहरांची अवस्था अशी झाली आहे असे ते म्हणाले. उणेपुरे शहर एक अशा त्या नाट्यरूपांतरात मी भाषेचे विविध स्तर वापरले जे मुळ नाटकात नव्हते. त्याचेही त्यांनी प्रयोग पाहिल्यावर कौतूक केले.’’ 
अशोक कुलकर्णी म्हणाले, ‘‘कार्नाड बुद्धीमान रंगकर्मी होते, त्यांच्या तुलनेत मी काहीच नव्हतो, मात्र महाविद्यालयीन मैत्रीची त्यांनी कायम जाण ठेवली. माझ्या साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान व विनोद दोषी फेस्टिवलला त्यांनी कायम उत्तेजन दिले, कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहिले. दोन वेळा व्याख्यानेपण दिली. रंगभूमीविषयक त्यांची जाण फार मोठी होती.’’ वैद्य म्हणाले, ‘‘ पुण्यातील अनेक रंगकर्मींबरोबर त्यांचा सातत्याने संवाद असे. मोहित टाकळकर हा नव्या पिढीचा प्रतिनिधी. त्याने त्यांचे उणेपुरे.. हे रुपांतरीत नाटक बसवले. ते पुुण्यात नाही पण बंगळूरूमध्ये डोक्यावर घेतले गेले, याचा त्यांना विलक्षण आनंद झाला. मोहितबरोबर ते नंतर कायम जोडले गेले.’’
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: karnad's continuous 'theatre contact' in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.