कमला नेहरू रुग्णालयात नवीन १०० खाटा वाढविल्याचा दावा, प्रत्यक्षात मात्र त्यावर उपचारच नाहीत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 16:12 IST2025-09-21T16:11:45+5:302025-09-21T16:12:22+5:30

सध्या कमला नेहरू रुग्णालयात एकूण ४२० खाटा उपलब्ध आहेत. परंतु, त्यातील केवळ २८७ खाटा रुग्णांच्या उपचारासाठी कार्यान्वित आहेत

Kamala Nehru Hospital claims to have added 100 new beds, but in reality there is no treatment available. | कमला नेहरू रुग्णालयात नवीन १०० खाटा वाढविल्याचा दावा, प्रत्यक्षात मात्र त्यावर उपचारच नाहीत  

कमला नेहरू रुग्णालयात नवीन १०० खाटा वाढविल्याचा दावा, प्रत्यक्षात मात्र त्यावर उपचारच नाहीत  

पुणे : महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) खाटा कमी असल्याबाबत नोटीस बजावत रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे सध्या रुग्णालय प्रशासनाची चांगलीच धावपळ उडालेली दिसत आहे. एनएमसीच्या दणक्यानंतर घाईगडबडीत १०० खाटा वाढवण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात या खाटांवर अद्यापही रुग्णसेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे ही खाटांमध्ये केलेली वाढ केवळ ‘दिखावा’ ठरत असल्याची टीका होत आहे.

सध्या कमला नेहरू रुग्णालयात एकूण ४२० खाटा उपलब्ध आहेत. परंतु, त्यातील केवळ २८७ खाटा रुग्णांच्या उपचारासाठी कार्यान्वित आहेत, तर उर्वरित १७३ खाटा अजूनही वापरात येणे बाकी आहे. यामध्ये जनरल मेडिसीन, सर्जरी, अस्थिरोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग तसेच आयसीयू आदी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर खाटा रिक्त आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या वर्षी रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. कमला नेहरू रुग्णालयात खाटा वाढवणे, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुरू करणे यासह अनेक सुविधा उभारण्याचे नियोजन कागदावर झाले, मात्र अंमलबजावणीत उणेपणा राहिला आहे. नवीन खाटा सुरू करण्यासाठी लागणारे तज्ज्ञ डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉय, आदी मनुष्यबळ उपलब्ध नाही, रुग्णसेवेत हीच सर्वांत मोठी अडचण ठरत आहे. जानेवारी २०२५ पासून एनएमसीकडून सातत्याने नोटिसा येत असल्यामुळे महापालिका दबावाखाली कार्यवाही करत असले तरी त्यातील फोलपणा उघड झाला आहे. सध्या रुग्णालयातील काही मजल्यांवर तात्पुरत्या खाटा मांडण्यात आल्या आहेत. त्यातील काहींवर ऑक्सिजन सुविधा बसवली जाणार असली तरी आवश्यक तांत्रिक व विद्युत कामे अपूर्ण असल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. 

कमला नेहरू रुग्णालयातील खाटांची सद्य:स्थिती

वैद्यकीय विभाग एनएमसीनुसार आवश्यक खाटा उपलब्ध खाटा कमी असलेल्या खाटा

जनरल मेडिसीन - १०० - ६० - ४०

बालरोग विभाग - ५० - ५० - ९

त्वचारोग १० - ० - १०

जनरल सर्जरी - १०० - ६० - ४०

अस्थिरोग विभाग - ४० - २० - २०

कान-नाक-घसा - २० - ० - २०

नेत्ररोग विभाग - २० - ० - २०

स्त्रीरोग विभाग - ५० - ५० - ०

आयसीयू - २० - ७ - १३

एकूण - ४२० - २८७ - १७३ 
 

कमला नेहरू रुग्णालयात १०० नवीन खाटा वाढवण्यात आल्या आहेत. एनएमसीच्या निकषांची पूर्तता करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत या खाटा कार्यान्वित होतील.  -  प्रदीप चंद्रन, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका 


एनएमसीच्या सूचनांनुसार विभागनिहाय खाटा वाढवल्या जात आहेत. मनुष्यबळासाठी सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. - डॉ. निना बोराडे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

Web Title: Kamala Nehru Hospital claims to have added 100 new beds, but in reality there is no treatment available.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.