नोकरीच्या आमिषाने बँकॉकला बोलावून ४० लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 09:26 PM2018-02-13T21:26:19+5:302018-02-13T21:26:34+5:30

कॅनडा, लॅकविया, युरोप, दक्षिण कोरिया या ठिकाणी नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून बँकॉकला बोलावून घेऊन १६ जणांना नोकरी न लावता तब्बल ४० लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. 

Job lure called for Bangkok to pay 40 lakhs | नोकरीच्या आमिषाने बँकॉकला बोलावून ४० लाखांचा गंडा

नोकरीच्या आमिषाने बँकॉकला बोलावून ४० लाखांचा गंडा

Next

पुणे : कॅनडा, लॅकविया, युरोप, दक्षिण कोरिया या ठिकाणी नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून बँकॉकला बोलावून घेऊन १६ जणांना नोकरी न लावता तब्बल ४० लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी संजयकुमार, नेहा, जोया, जितेंद्र अशी नावे असलेल्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी जोनाकुमार आनंदराव डोक्का (वय ३६, रा. गंगा लोटस, उंड्री) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोक्का यांची ग्रेस कनक्ट फ्री लान्सर या नावाची प्लेसमेंट कन्सल्टन्सी आहे़ त्या २०१४ पासून वेगवेगळ्या कंपन्यांना कामगार पुरविण्याचे काम करतात. एप्रिल २०१७ मध्ये त्यांना नेहा नावाने फोन आला. दिल्लीतील अजय ट्रु व्हिसा प्लेसमेंट कंन्सल्टन्सी कंपनीतून बोलत असून आमच्याकडे दक्षिण कोरिया, लॅटव्हिया, युरोप, कॅनडा या ठिकाणी सर्व प्रकारच्या कामगारांच्या जागा आहेत. तुमच्याकडे कोणी अर्ज केले आहेत का, अशी विचारणा केली. त्यानंतर मूळमालक संजयकुमार याने आम्ही सर्व प्रोसिजर बँकॉक येथून करतो. 

सध्या मी बँकॉक अ‍ॅम्बसीत कामाला असून सर्व प्रोसिजर पूर्ण करायला १० ते १५ दिवस लागतील. त्यासाठी कामगारांना बँकॉकला यावे लागेल. त्याप्रमाणे डोक्का यांनी १२ कामगारांची माहिती पाठविली. प्रत्येक कामगाराला ३ लाख ५० रुपये प्रोसेसिंग फी, येण्या-जाण्याचे तिकीट व बँकॉलला आल्यावर राहणे व जेवण, व्हिसा प्रोसेजसाठी १ हजार यूएस डॉलर द्यावे लागतील, असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी प्रथम ४ कामगारांना बँकॉकला पाठविले. पण १ हजार डॉलर घेऊनही त्यांची काहीही सोय न झाल्याने शेवटी ते लोक परत भारतात आले. त्यानंतर डोक्का यांनी संजयकुमार यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांनी आता मी स्वत: व्यवस्था करतो असे सांगितले. त्यानंतर डोक्का या आणखी १२ कामगारांना घेऊन बँकॉकला गेल्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या बँक खात्यात प्रत्येक कामगारांचे ३ लाख ५० हजार रुपये भरले. त्यांनी स्वत: अडीच लाख रुपये भरले. पण तीन दिवसात त्यांचे काम झाले नाही. त्यांना भारतात परत येण्याचे तिकीट रद्द करायला लावले. 

१९ मे २०१७ रोजी ते राहत असलेल्या हॉटेलवर त्यांचे पासपोर्ट पाठवून दिले. त्यावर ज्या देशात नोकरी लावणार होते, त्या देशाचा व्हिसा शिक्का नव्हता. त्यांनी संजयकुमार याला विचारल्यावर माझ्याकडे तुमचे पैसे असून तुम्ही भारतात परत जा. मी पैसे परत करेन किंवा आॅनलाइन व्हिसा करून देईन, असे आश्वासन दिले. परंतु, त्यांनी एकही पैसा परत न करता किमान ४० लाख रुपयांची फसवणूक केली. डोक्का यांनी अगोदर सायबर क्राईम शाखेकडे तक्रार अर्ज केला होता. तेथून तो कोंढवा पोलीस ठाण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Job lure called for Bangkok to pay 40 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा