पुणे : इंदूर-दौंड एक्स्प्रेसने जात असलेल्या प्रवाशाला बॅगा उतरवण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करत चोरट्यांनी बॅगेतील ११ लाख रुपयांचे दागिने लंपास केले होते. पुणे लोहमार्ग पोलिसांनी या चोरट्याला पकडून त्याच्याकडून १० लाख ८४ हजार रुपयांचे दागिने जप्त केले. पोलिसांनी १५० सीसीटीव्ही फुटेज तपासून चोराचा शोध लावला. हे दागिने एका कार्यक्रमात दाम्पत्याला परत करण्यात आले.
शिरीष विठ्ठलराव शितोळे (७३, रा. देवारा, मध्य प्रदेश) हे इंदौर-दौंड एक्स्प्रेसने १३ जानेवारी रोजी दुपारी येत होते. पुणे रेल्वे स्टेशनजवळ आल्यावर चौघांनी त्यांना सामान उतरवण्यास मदत करतो, असे सांगून त्यांची बॅग हातात घेतली. रेल्वेतून उतरल्यानंतर शितोळे यांना बॅग परत करून ते निघून गेले. तेव्हा शितोळे यांना ट्रॉली बॅगची चेन उघडी असल्याचे दिसले. त्यांनी बॅग उघडून पाहिल्यावर बॅगेतील ११ लाख २८ हजार १५० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने ठेवलेली पर्स नव्हती. यानंतर त्यांनी लगेचच लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
गुन्हा दाखल होताच तपास पथकाने सुमारे १५० ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले. सीसीटीव्हीतील संशयितांच्या हालचालींवरून आरोपी निष्पन्न केले. त्यांचे फोटो मिळवल्यानंतर, दागिने चोरणारा आरोपी हा घोरपडी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घोरपडी रेल्वे यार्ड येथे जाऊन आरोपी सुमितकुमार सतवीरसिंह (३०, रा. सुलतानपुरी, सनी बाजार रोड, दिल्ली, मूळ रा. जाटलुहारी, ता. भवानी खेडा, जि. भवानी, हरियाणा) याला पकडले. त्याच्याकडून १० लाख ८३ हजार ४०० रुपयांचे चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ते फिर्यादी यांना परत करण्यात आले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर, उपनिरीक्षक यशवंत साळुके यांच्यासह पथकाने केली.