पुणे : सध्या खून, दरोडे, घरफोडी, चोरी सारख्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंतेचा विषय बनला आहे. अशाच एका चोरीच्या प्रकरणात ज्येष्ठ दाम्पत्याच्या सदनिकेतून साडेपाच लाख रुपयांचे दागिने चोरून पसार झालेल्या अल्पवयीनांना कोथरूड परिसरातील २०० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले.
कोथरूड भागातील हॅप्पी काॅलनीत एका सोसायटीत ज्येष्ठ दाम्पत्य राहायला आहे. ७ मार्च रोजी बंद सदनिकेचे कुलूप तोडून अल्पवयीनांनी कपाटातील साडेपाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पथकाने सदनिकेत चोरी करून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू केला. पोलिसांनी कोथरूड परिसरातील २०० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अल्पवयीनांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले. चौकशीत एका अल्पवयीनाच्या भावाकडे उर्वरित दागिने असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने हडपसर भागातून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दागिने जप्त करण्यात आले. पोलिसांनी साडेपाच लाख रुपयांचे दागिने जप्त केले. दाखल गुन्ह्यात चोरीला गेलेल्या १४४ ग्रॅम दागिन्यांपैकी ११८ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
अलंकार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीता रोकडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश दीक्षित, महेश निंबाळकर, पोलिस कर्मचारी धीरज पवार, सोमेश्वर यादव, शशिकांत सपकाळ, अतुल क्षीरसागर, शिवाजी शिंदे, अंकुश लोंढे, साईनाथ पाटील, नवनाथ आटोळे, माधुरी कुंभार, सोनल म्हसकुले यांनी ही कारवाई केली.