अधिकमासानिमित्त देवदर्शनाला जाणाऱ्या जीपला टेम्पोची धडक,एक ठार, अकराजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 15:29 IST2018-05-29T15:29:01+5:302018-05-29T15:29:01+5:30
जळगाव जिल्ह्यातील एकाच कुटुंबाचा अपघातात समावेश आहे

अधिकमासानिमित्त देवदर्शनाला जाणाऱ्या जीपला टेम्पोची धडक,एक ठार, अकराजण जखमी
चाकण : अधिकमासानिमित्त देवदर्शनासाठी जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या क्रुझर जीपला भरधाव टेम्पोने ठोस देऊन झालेल्या अपघातात एक भाविक ठार झाला आहे. एकाच कुटुंबातील अकरा भाविक जखमी झाले आहेत.अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला असून अज्ञात टेम्पो चालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार प्रमोद भोसले यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी ( दि. २९ ) रात्री दीडच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रस्त्यावर बहुळ गावच्या हद्दीत शेतकरी मॉल समोर झाला. या अपघातात सागर वसंत बडगुजर ( वय ३५, रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ, ता. जि. जळगाव ) हा युवक जागीच ठार झाला. याबाबतची फिर्याद किशोर प्रकाश बडगुजर ( वय ३२, रा. कुऱ्हे पानाचे, ता. भुसावळ, जि.पुणे ) यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील बडगुजर कुटुंबातील १२ जण क्रुझर जीप क्रमांक ( एम एच ११ ए डब्ल्यू ७८८५ ) मधून अधिकमासानिमित्त तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर, गणपती पुळे, जेजुरी, मोरगाव, थेऊर, आळंदी, देहू या तीर्थक्षेत्रांना दर्शनासाठी गेले होते. रात्री दीडच्या सुमारास चाकण बाजूकडून शिक्रापूर बाजूकडे जात असताना बहुळ गावच्या हद्दीत जीपला भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो ( एमएच १४ डीएम ४९७१ ) ने जोरदार धडक देत अपघात घडला. या अपघातात सागर जागीच ठार झाला. तर जीपमधील बडगुजर कुटुंबातील फिर्यादी किशोर यांची पत्नी कल्याणी ( वय ३० ), मुलगा कुणाल ( वय ४ ), भाऊ नितीन ( वय ३७ ), भावजय पूर्णिमा ( वय ३५ ), पुतणी वैष्णवी ( वय ११ ), पुतण्या नितेश ( वय ८ ), सासू लता ( वय ५५ ), मेहुणी साक्षी उर्फ सोनी सागर बडगुजर ( वय ३० ), सागरचा मुलगा कुशल ( वय ४ ), मुलगी मुग्धा ( वय ३ ), आणि जीपचालक प्रदीप पंढरी शिंदे ( वय ३२, सर्व रा. कुºहे पानाचे, ता.भुसावळ, जि जळगाव ) हे अकरा भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.शवविच्छेदन करून सागरचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अपघात पथकाचे हवालदार विठ्ठल कुंभार पुढील तपास करत आहेत.