Video: जय श्री केदार! हजारो किलोमीटरचा प्रवास सायकलवरून; बारामतीचे २ तरुण केदारनाथच्या चरणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 17:15 IST2023-07-30T16:39:32+5:302023-07-30T17:15:11+5:30
केदारनाथ मंदिर परिसरात सायकलवर आल्यावर या तरुणांना अक्षरशः डोळ्यातून पाणी आले

Video: जय श्री केदार! हजारो किलोमीटरचा प्रवास सायकलवरून; बारामतीचे २ तरुण केदारनाथच्या चरणी
सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील उत्साही दोन तरुणांनी दोन हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवर करुन केदारनाथ गाठले. त्यांच्या या जिद्दीचे ग्रामस्थांसह बारामती लोकसभा मतदार संघातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर त्यांचा हा प्रवास इथेच थांबत नसून पुढे नेपाळ येथील पशुपतीनाथ मंदिराकडे होणार आहे.
सुपे येथील विलास वाघचौरे आणि देऊळगाव रसाळ येथील रोहित लोंढे या दोन तरुणांनी २३ जुनला केदारनाथकडे सायकलवर प्रवासाला सुरुवात केली. तब्बल २६ ते २७ दिवसात त्यांनी केदारनाथ मंदिर गाठले. यावेळी केदारनाथ मंदिर परिसरात सायकलवर आल्यावर या तरुणांना अक्षरशः डोळ्यातून पाणी आले. काहींना जिवनात येऊन एकदाही केदारनाथ होत नाही. तर यांनी सायकलवर केलेला प्रवास हा थक्क करणारा आहे. या दरम्यान विलासने घरातून घेतलेले ५० रुपयांची नोट अद्याप तशीच जपुन ठेवली आहे. या प्रवासादरम्यान सुरुवातीला बारामती सायकल क्लबच्यामाध्यमातुन सायकल, टि शर्ट आणि पंक्चर साहित्य देण्यात आले. तसेच प्रवासात माहिती असणाऱ्या व्यक्तींनी गुगल आणि फोन पे यावरुन पाठवलेल्या पैशावरच हा प्रवास खर्च केल्याचे वाघचौरे यांनी सांगितले.
हजारो किलोमीटरचा प्रवास सायकलवरून; बारामतीचे २ तरुण केदारनाथच्या चरणी#Pune#kedarnathpic.twitter.com/YUdb9pTeP2
— Lokmat (@lokmat) July 30, 2023
केदारानाथ दरम्यान हरिद्वार, उज्जैन, ऋषिकेश, धारिवाली आणि गुप्तकाशी हा प्रवास २ हजार किलोमीटरचा झाला. तर आत्ता केदारनाथ करुन बद्रिनाथ व पुढे नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिराकडे जाणार आहे. यापुढील हा प्रवास आकराशे किलोमीटरचा असणार आहे. तर परतीच्या प्रवासात गुजरात मधील सोमनाथ मंदिराचे दर्शन करुन येण्याचा मानस असल्याचे वाघचौरे यांनी सांगितले. या प्रवासात राहण्याची व जेवणाची कुठेच अडचण आली नाही. राहण्यासाठी शक्यतो मंदिर, धर्मशाळा तर जेवणासाठी मंदिरातील तसेच जाताना कोणता कार्यक्रम असेल तर तिथेच जेवणाचा ताव मारायचा असे ठरलेले होते. त्यामुळे अडचण आली नाही. हरियाणामध्ये मंदिरात जेवण नव्हते तर शेजारी असणाऱ्या नागरिकांनी गरमागरम जेवण तयार करुन दिले.