जय महाराष्ट्र! मनसे नगरसेवकाच्या कोरोनातील कार्याची 'WHO'कडून दखल; 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 22:18 IST2021-07-10T21:57:41+5:302021-07-10T22:18:07+5:30
मनसेचे शहराध्यक्ष व पुणे महानगपालिकेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी कोरोना संकटात पहिल्या दिवसापासून सामाजिक बांधिलकी जपत झोकून देत काम केलं आहे.

जय महाराष्ट्र! मनसे नगरसेवकाच्या कोरोनातील कार्याची 'WHO'कडून दखल; 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद
पुणे : कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो वा कोरोना संकट..हा माणूस सतत माणुसकीचे दर्शन घडवितो. याचसोबत आपल्या आक्रमक शैलीने पुणे महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाला खडबडून जाब विचारणारं आणि एकापेक्षा एक हटके आंदोलनांसाठी प्रसिद्ध असणारं व्यक्तिमत्व म्हणून मनसेचे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे ओळखले जातात. त्यांच्या कोरोना काळातील सामाजिक कार्याची दखल थेट जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दखल घेतली आहे.
मनसेचे शहराध्यक्ष व पुणे महानगपालिकेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी कोरोना संकटात पहिल्या दिवसापासून सामाजिक कार्यासाठी झोकून देऊन काम केले आहे.त्याचीच दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने मोरे यांचा गौरव करत त्यांचा 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये समावेश केला आहे. मोरे यांनी दिलेल्या कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकीच्या आणि समर्पित व प्रामाणिक भावनेतून मानवी सुरक्षिततेसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन हा गौरव करण्यात आल्याचा जागतिक आरोग्य संघटनेनेच्या प्रशस्तिपत्रात नमूद केले आहे.
वसंत मोरे यांनी कोरोनाच्यासंकटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शहरात बेड्सची कमतरता असताना आणि रुग्णांना उपचारासाठी प्रचंड धावपळ करावी लागत होती त्या काळात एका हॉटेलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या कोविड सेंटरची निर्मिती केली होती.या त्यांच्या कार्याची शहरात खूप चर्चा देखील झाली होती. यामुळे बऱ्याच रुग्णांना मोठा आधार मिळाला होता. तसेच नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती सुद्धा केली होती.
याबाबत वसंत मोरे म्हणाले, कोरोना संकटाला एक संधी समजलो. या संधीचं सोनं करताना फक्त नागरिकांना जे हवं आहे. त्याप्रमाणे काम करत गेलो. कोरोना संकटात लोकांच्या गरजा ओळखल्या आणि मग त्या त्या वेळेनुसार मग जीवनावश्यक वस्तू, धान्यकीट, औषधे, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या काळात अगदी कोविड सेंटर सुरु करण्यापर्यंत धडक मारली.कोरोनाने कोणत्याही संकटाला भिडण्याची ताकद दिली. आणि माझ्या कोरोना काळातील कार्याची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली याचा खूप आनंद आणि समाधान आहे.