निष्ठावंत पदाधिकाऱ्याचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 17:37 IST2023-04-02T17:20:54+5:302023-04-02T17:37:49+5:30
खेड-आळंदी विधानसभा आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना न्याय देण्यासाठी भाजपात प्रवेश

निष्ठावंत पदाधिकाऱ्याचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
आळंदी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी अखेर उद्धव ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ५ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राम गावडे यांच्यासोबत त्यांचे समर्थक, गावोगावचे सरपंच-उपसरपंच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
धानेारे (ता. खेड) येथील शाखा प्रमुखपदापासून राम गावडे यांनी १९९१ पासून आपल्या राजकीय कारर्किदीस सुरुवात केली. पक्ष संघटनेतील बहुतेक सर्वच पदांवर काम करुन तब्बल सहा वर्षे पुणे शिवसेना जिल्हाप्रमुख असलेले राम सदाशिव गावडे हे येत्या ५ तारखेला भाजपत प्रवेश करीत आहेत. याबाबतची माहिती राम गावडे यांनी माध्यमांना दिली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे राज्याच्या सर्वोच्च स्थानी बसूनही सामान्य शिवसैनिकांसह जिल्ह्यातील विकासासाठी काहीच दिले गेले नाही. सतत अवमानाची वागणूक आणि वारंवार बैठका-चर्चा करुनही अंमलबजावणीच होत नसल्याने खेड-आळंदी विधानसभा मतदार संघ तसेच शिरुर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण भाजपत प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव, तसेच माजी आमदार सुरेश गोरे यांचे कुटुंब शिंदे गटात दाखल झाले तरी देखील उद्धव ठाकरे यांनी आपली दखल घेतली नाही. त्यामुळे ठाकरे गटातील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त होत असल्याचे पत्र उध्दव ठाकरे यांना ३१ मार्च रोजी पाठविल्याची माहिती गावडे यांनी दिली आहे. राम गावडे यांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे आळंदी आणि पंचक्रोशीत भाजपला भविष्यात मोठी ताकद मिळणार आहे.