जय भवानी, जय शिवराय! पुण्यात शिवरायांचा ज्वलंत इतिहास अनुभवता येणार
By श्रीकिशन काळे | Updated: February 13, 2025 16:50 IST2025-02-13T16:49:28+5:302025-02-13T16:50:52+5:30
शिवप्रेमींना आधुनिक थीम पार्कच्या धर्तीवर असलेला फिरता मंच आंबेगाव बुद्रुक शिवसृष्टी येथे साकारला आहे

जय भवानी, जय शिवराय! पुण्यात शिवरायांचा ज्वलंत इतिहास अनुभवता येणार
पुणे: शिवरायांचा पराक्रम आता प्रत्येकाला प्रत्यक्षात समोर घडताना अनुभवता येणार आहे. शिवसृष्टीचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून, येत्या शिवजयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण होणार आहे. शिवप्रेमींना आधुनिक थीम पार्कच्या धर्तीवर असलेला फिरता मंच या ठिकाणी साकारला आहे. त्यामध्ये शिवरायांचा ज्वलंत इतिहास पाहता येईल.
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथे शिवसृष्टी साकारली जात आहे. त्याचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त जगदीश कदम यांनी दिली. याप्रसंगी विश्वस्त विनीत कुबेर, सुनील मतालिक, अनिल पवार आदी उपस्थित होते. दुसऱ्या टप्प्यात एक भव्य स्वागत कक्ष, आधुनिक थीम पार्कला साजेल असे टाइम मशीन थिएटर व तुळजाभवानी मातेचे भव्य मंदिराचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज माणूस म्हणून कसे होते, हे देखील सर्वांपर्यंत पोचविण्याचे ध्येय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे होते. त्यानूसार या टप्प्याची रचना केली. स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा ही शिवाजी महाराजांना जवळची असणारी महत्त्वाची तीन तत्वे यावर आधारित सर्व निर्मिती केली.
भव्य स्वागतकक्षामध्ये शिवसृष्टीची प्रतिकृती साकारली आहे. तसेच शिवरायांचे ६ मोठे पोट्रेट लावले आहेत. याचे वैशिष्ट्ये म्हणजे शिवरायांच्या काळात काढलेल्या व सध्या जगातील प्रसिध्द संग्रहालयात असलेल्या चित्रांच्या प्रिंट्स आहेत. शिवाजी महाराजांनी केलेल्या लढायांची माहिती देखील येथे वाचायला मिळेल.
तुळजाभवानी मातेचे भव्य मंदिर !
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्याचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी मातेचे मंदिर या दुसऱ्या टप्प्यात साकारले आहे. मंदिरातील मूर्ती ज्येष्ठ मूर्तीकार डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बनवली आहे. तिची प्रतिष्ठापना मंदिरात होणार आहे आणि या टप्प्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या दिवशी होईल.
फिरते थिएटर !
विशेष असे टाइम मशीन थिएटर जे शिवप्रेमींना एक पर्वणी ठरेल. यामध्ये सुमारे १ हजार वर्ष मागे जाऊन तिथून शिवाजी महाराजांच्या काळात येतो. तीन तत्वावर आधारित कथा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उलगडली आहे. यामध्ये मॅपिंग, होलोग्राफी, फिजिकल इफेक्ट व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ३६० अंशामध्ये फिरणारे रोटेटिंग म्हणजे फिरते थिएटर ज्यावर एका वेळी ११० व्यक्ती बसू शकतील. यात ३३ मिनिटांचा शो अनुभवता येईल.