Maharashtra Weather Updates : राज्यातील थंडी लागली ओसरू..! किमान तापमानात अनेक ठिकाणी वाढ
By श्रीकिशन काळे | Updated: December 21, 2024 16:57 IST2024-12-21T16:57:27+5:302024-12-21T16:57:50+5:30
पुढील दोन दिवसांत राज्याच्या किमान तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होईल

Maharashtra Weather Updates : राज्यातील थंडी लागली ओसरू..! किमान तापमानात अनेक ठिकाणी वाढ
पुणे : राज्यामधील थंडीची लाट आता ओसरू लागल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली आहे, पण राज्यातील गारठा मात्र कायम आहे. पुढील दोन दिवसांत राज्याच्या किमान तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुण्यातील थंडीही गायब झाली असून, हवेत गारवा मात्र जाणवत आहे.
पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, उत्तर आणि ईशान्येकडे सरकत आहे. शनिवारी (दि.२१) या प्रणालीची तीव्रता वाढू शकते. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका जरा कमी झाल्याचे पहायला मिळत आहे.
दरम्यान, राज्यामधील थंडी कमी होऊ लागली आहे. पण धुळे, निफाड, जळगाव, अहिल्यानगर येथील गारठा अद्याप कमी झालेला नाही. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या वर गेला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाले आहे. त्यामुळेच राज्यातील थंडी ओसरू लागली आहे. किमान तापमान आता १० अंशाच्या वरती जात आहे.