पुणे: शिवसेनेतील प्रवेशाने माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे एक राजकीय वर्तुळ पूर्ण होत आहे. शिवसेनेतून सुरू झालेली त्यांची कारकीर्द महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काही काळ अपक्ष, त्यानंतर काँग्रेस आणि आता परत शिवसेना एकनाथ शिंदे गट असा धंगेकर यांचा राजकीय प्रवास राहिला. त्यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाने या सेनेचे पुण्यातील शिलेदार सावध झालेले दिसत आहेत.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने हा प्रवेश झाल्याचे सांगण्यात येते. म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या पदावर शिंदेसेनेचे असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांची नियुक्ती होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत ते ऐनवेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी म्हणून गेले. त्यांचा पराभव झाला. मात्र, ते आता तिथे असल्यामुळे म्हाडाचे अध्यक्षपद शिंदेसेनेकडेच आहे, असा दावा करून त्यांना बाजूला करत ते पद धंगेकरांना दिले जाईल, असे बोलले जाते. मात्र, इतकी मोठी राजकीय कसरत माजी आमदारासाठी म्हणून एकनाथ शिंदे करतील, असे राजकीय जाणकारांना काही वाटत नाही. खुद्द धंगेकर यांनीही कोणत्याही अटीशर्तींशिवाय आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलो असल्याचे सांगितले.
काँग्रेसमध्ये स्थानिक नेत्यांकडून होत असलेल्या त्रासानंतर मला राजकीय विचार करणे भाग होते. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मला पटले, ते मला जवळचे वाटले, त्यामुळे मी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला, असे धंगेकर यांनी सांगितले. ते असे सांगत असले तरी त्यांच्या या प्रवेशामुळे शिंदेसेनेतील शिलेदारांना धसका बसला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाजूला गेल्यानंतर पुणे शहरातून लगेचच त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक नाना भानगिरे आले. त्यानंतर किरण साळी, मग अजय भोसले यांनी त्यांना साथ दिली. त्यानंतर मात्र शिंदेसेनेतील प्रवेश थांबले होते. आता धंगेकर यांच्यासारख्या माजी आमदाराचा प्रवेश होत आहे. मात्र, त्यांना पक्षाने काही दिले तर मग आम्ही इतके दिवस पक्षाची बाजू समर्थपणे सावरून धरली त्याचे काय? असा प्रश्न आताच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.
शहराध्यक्ष भानगिरे यांनी सांगितले की, जर-तर याला काही अर्थ नाही. त्यांना आमच्या पक्षात यावेसे वाटले याचा अर्थ आमचा पक्ष वाढतो आहे हाच आहे. त्यामुळे धंगेकर यांचे स्वागत आहे. त्यांना कोणती जबाबदारी द्यायची हे पक्षाचे प्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील आणि ते आम्हाला मान्य असेल.