पुणे : ‘एआरआय’ टेकडीवर एका चारचाकी वाहनाच्या कंपनीकडून गाड्यांचे प्रमोशन केले जात आहे. गाडीमध्ये मोठ्या आवाजात घोषणा केली जात आहे. फिरायला येणाऱ्या टेकडीप्रेमींनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही काय चारचाकी गाडीचे प्रमोशन करण्याची जागा आहे का? असा सवालही उपस्थित केला आहे.
निवांतपणा मिळावा म्हणून पुणेकर सकाळी-सायंकाळी टेकडीवर फिरायला जातात. शुद्ध हवादेखील तिथे मिळते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ‘एआरआय’ टेकडीवर पार्किंग परिसरात एका चारचाकी कंपनीकडून गाड्यांचे प्रमोशन करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ्या आवाजात घोषणाही दिल्या जात आहेत. याविषयी काही नागरिकांनी वनविभागाकडे तक्रारदेखील केली आहे.
...अन् आम्ही अवाक् झालो
आम्ही सोमवारी एआरआय टेकडीवर फिरायला गेलो हाेताे, तेव्हा चारचाकीमधून मोठ्या आवाजात घोषणा दिल्या जात होत्या. त्या ऐकून नेमकं काय चाललं आहे, असं त्यांना विचारलं. तेव्हा त्यांनी चारचाकी गाडीचे प्रमोशन सुरू असल्याचे सांगितले. हे ऐकून आम्ही अवाक् झालो. कारण त्या परिसरात पक्षी, मोरांची संख्या बरीच आहे. तसेच नागरिक फिरत असतात. त्या सर्वांना त्याचा त्रास होतो. हे त्वरित बंद करायला हवे, अशी प्रतिक्रिया टेकडीप्रेमींनी दिली.