पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सासू लता हगवणे, ननंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना पोलिसांनी पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं असून, त्यांना २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी दिलेली पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
छळाचे खळबळजनक पुरावे
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, वैष्णवीच्या अंगावर तब्बल २९ मारहाणीचे व्रण आढळले असून, त्यातील ५ ते ६ जखमा आत्महत्येच्या अगदी काही तासांपूर्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे अत्यंत गंभीर असून, तिच्यावर सतत शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी न्यायालयात मांडलेले महत्त्वाचे मुद्दे
- हगवणे कुटुंबीयांच्या सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत
- वैष्णवीच्या नावावरचं सोनं तारण ठेवून त्यातून मिळालेल्या रकमेचा वापर कुठे झाला, हे अद्याप स्पष्ट नाही.
- या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबीयांमधील संबंधांचा तपास करणे गरजेचे आहे.
- तिन्ही आरोपींची एकत्रित चौकशी करणे आवश्यक असल्यामुळे पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी केली होती.
सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल?
पोलिसांच्या तपासात, वैष्णवीला तिच्या सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक त्रास दिला जात होता. तिला वेळोवेळी मारहाण करण्यात येत होती. कौटुंबिक कलह, हुंड्याची मागणी आणि आर्थिक कारणांमुळे हा छळ दिवसेंदिवस वाढत गेला. अखेर सहनशक्तीचा अंत होऊन वैष्णवीने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी मांडला आहे.
फरार आरोपीचा शोध सुरू
या प्रकरणात अजूनही निलेश चव्हाण हा आरोपी फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक प्रयत्न करत आहे. त्याच्या हगवणे कुटुंबीयांशी असलेल्या संभाव्य संबंधामुळे तपास अधिक गंभीर बनला आहे.
न्यायासाठी लढा सुरूच
वैष्णवीच्या कुटुंबियांनी या घटनेनंतर न्याय मिळवण्यासाठी जोरदार पाठपुरावा केला आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू असून, समाजात संतापाचं वातावरण आहे. आता या प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे."