पालिकेच्या ठेकेदाराचा बेजबाबदारपणा; खोदकाम करताना खांब कोसळून महाविद्यालयीन युवती जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 10:03 IST2025-07-12T10:03:39+5:302025-07-12T10:03:55+5:30
खोदकाम सुरू असताना अचानक खांब तिच्या अंगावर कोसळल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाली

पालिकेच्या ठेकेदाराचा बेजबाबदारपणा; खोदकाम करताना खांब कोसळून महाविद्यालयीन युवती जखमी
पुणे: रस्त्याचे खोदकाम करताना खांब कोसळल्याने पादचारी महाविद्यालयीन युवती जखमी झाल्याची घटना रविवार पेठेतील देवजीबाबा चौकात घडली. पुरेशी काळजी न घेता खाेदकाम करणाऱ्या महापालिकेच्या ठेकेदाराविरोधात फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रविवार पेठेत राहणारी महाविद्यालयीन तरुणी जखमी झाली आहे. तिने फरासखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरुणी ही एका कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकत आहे. रविवार पेठेतील देवजीबाबा चौकात रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. तेथील एका लोखंडी खांबावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तरुणी गुरुवारी (दि.१०) सकाळी साडेअकराच्या सुमारास देवजीबाबा चौकातून निघाली होती. खोदकाम सुरू असताना अचानक खांब तिच्या अंगावर कोसळला. त्यामध्ये तिच्या डोक्याला दुखापत झाली. उपचारासाठी तिला रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर तिने रात्री उशिरा पोलिसांकडे तक्रार दिली. खोदकाम सुरू असताना ठेकेदाराने पुरेशी काळजी घेणे गरजेचे होते. खांब दोरीने बांधण्याची गरज होती. ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे तिला दुखापत झाली.