कामातील अनियमितता पडली महागात; लोणावळ्याचे परिरक्षण भूमापक निलंबित
By नितीन चौधरी | Updated: February 6, 2025 13:52 IST2025-02-06T13:52:20+5:302025-02-06T13:52:35+5:30
कामात अनियमितता, विलंब केल्याप्रकरणी कारवाई; उपअधीक्षकांचीही विभागीय चौकशी

कामातील अनियमितता पडली महागात; लोणावळ्याचे परिरक्षण भूमापक निलंबित
पुणे : कामात अनियमितता तसेच विलंब केल्याप्रकरणी लोणावळा येथील परिरक्षण भूमापक (मेंटेनन्स सर्व्हेअर) विनायक वाघचौरे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. तसेच वडगाव मावळच्या उपअधीक्षक पल्लवी पाटील पिंगळे यांच्या विभागीय चौकशीचे आदेश जारी केले आहेत. याबाबत नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार ही कारवाई केल्याची माहिती भूमी अभिलेख उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी दिली.
वाघचौरे यांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्याने जमाबंदी आयुक्तालयाने दप्तर तपासणीचे आदेश दिले होते. वाघचौरे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील नागोठणे येथील परिरक्षण भूमापक राहुल भोसले यांचीही दप्तर तपासणी करण्यात आली. जमिनीची मोजणी, वारस नोंद, मालमत्तांच्या व जमिनीच्या खरेदी विक्रीची नोंद नियमानुसार २५ दिवसांत निकाली काढणे, त्यानुसार नोंदी करून वरिष्ठ कार्यालयाकडे त्याची माहिती पाठविणे अपेक्षित असते. मात्र, वाघचौरे यांच्याकडील अनेक प्रकरणांत अनेक महिने कार्यवाही झाली नसल्याचे आरोप होते. तसेच लाचखोरीचेही आरोप होत होते.
या तक्रारी लक्षात घेऊन जमाबंदी आयुक्त कार्यालयाने कार्यालयीन अधीक्षकांमार्फत वाघचौरे यांच्या कार्यालयाची दप्तर तपासणी केली. काही अर्जांच्या फाइल आढळत नसल्याचे निष्पन्न झाले. यामुळे विभागाची प्रतिभा मलिन होत असल्याने वाघचाैरे तसेच भोसले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले. वाघचौरे यांच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी उपअधीक्षक यांची असल्याने या तपासणीत पल्लवी पाटील-पिंगळे यांचेही दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे गोळे यांनी स्पष्ट केले.