पुणे : आयुष कोमकर याचा खून करुन माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अमन पठाण याने शस्त्रे पुरविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या खून प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी ६ जणांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
सूर्यकांत ऊर्फ बंडु राणोजी आंदेकर (वय ७०, रा. नाना पेठ), स्वराज निलंजय वाडेकर (वय २३, रा. नाना पेठ), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय ४० , रा. रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, डोके तालीम जवळ), तुषार निलंजय वाडेकर (वय २७, रा. नाना पेठ), अमन युसुफ पठाण ऊर्फ खान (वय २५, रा. डोके तालीमजवळ, नाना पेठ) आणि सुजल राहुल मेरगु (वय २०, रा. नाना पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या खून प्रकरणात १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, यापूर्वी अमित प्रकाश पाटोळे (वय १९, रा. नाना पेठ) आणि यश सिद्धेश्वर पाटील (रा. नाना पेठ) या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
आंबेगाव पठार येथील आंदेकर टोळीचे प्रतिस्पर्धी सोमनाथ गायकवाड व त्याच्या टोळीतील सह आरोपी यांच्या घराची रेकी करताना आढळून आलेल्या दत्ता काळे याच्याबरोबरच भारती विद्यापीठाच्या खुनामध्ये देखील या आरोपींचा समावेश आहे. आपल्या टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांना जीवे ठार करण्याचा कट नियोजन यापूर्वीच केल्याचे निष्पन्न होत आहे. या गुन्ह्यात वापरलेले पिस्टल व त्यामधील राऊंड कोठून आणले आहे, त्यांना कोणी पुरविले आहे, याबाबत आरोपीकडे तपास करायचा आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची आहे. फरार आरोपींचा ठाव ठिकाणाबाबत अटक आरोपीकडे तपास करुन त्यांना अटक करायची आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. सरकारी वकील नीलिमा इथापे यांनी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने अधिक तपासासाठी आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
दाखल गुन्हयात कलम वाढ
अमन् पठाण व यश पाटील यांनी भवानी पेठ येथील एका पार्किंगमध्ये पिस्टलने फायरिंग करुन खून करुन " इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच' असे बोलून याठिकाणी दहशत माजविली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दाखल गुन्हयात क्रिमीनिल लाँ अमेडमेंड कलम 7 प्रमाणे कलमवाढ करण्यात आल्याचे तपास अधिकारी यांनी न्यायालयात सांगितले.