Inspirational ..! Tenth pass Pallavi Handen turnover millions in a month | प्रेरणादायी ..! दहावी पास पल्लवी हांडेंची महिन्याला लाखोंची उलाढाल

प्रेरणादायी ..! दहावी पास पल्लवी हांडेंची महिन्याला लाखोंची उलाढाल

ठळक मुद्देसेंद्रिय शेतीला प्राधान्य : शेतमालाच्या ‘ऑनलाईन’ विक्रीचे ‘मॉडेल’ केले यशस्वी महिला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ‘स्वराज युवा आत्मा’ बचत गट सुरू शेतकरी महिला आर्थिक सक्षमशेतमाल लावण्यापूर्वीच हमीभाव

- सुषमा नेहरकर-शिंदे- 
पुणे : कुटुंबाची केवळ साडेचार एकर शेती. या शेतात पिकणारा बेभरवशाचा माल. निसर्गाच्या लहरीपणा व खता-औषधांचा वाढता खर्च यामुळे शेतीवर कुटुंब जगवणे कठीण होते. परंतु कृषी पदवी घेतलेला भाचा आणि नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने जुन्नर तालुक्यातील गोळेगाव येथील केवळ दहावी पास असलेल्या पल्लवी गणेश हांडे यांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू केला. सुरुवातीला केवळ दहा-वीस किलो शेतमालाची विक्री करणाऱ्या पल्लवी यांनी परिसरातील महिलांना एकत्र करून शेतमालाची थेट ‘ऑनलाईन’ विक्री सुरू केली. गेल्या तीन-चार वर्षांतच साडेचार एकर शेती ते शेतकरी कंपनी स्थापन करून महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल सुरू केली. यामुळे पल्लवी हांडे यांनी पंचक्रोशीत महिला शेतकऱ्यांसमोर वेगळा आदर्श उभा केला आहे. 
पल्लवी हांडे यांनी सांगितले, की चार वर्षांपूर्वी मी व कुटुंबातील लोक पारंपरिक पद्धतीने शेती करीत होतो. परंतु कुटुंबातील लोकांची संख्या आणि शेतीतून मिळणारे उत्पन्न यामध्ये ताळमेळ बसत नव्हता. तेव्हा कृषी पदवी घेतलेल्या भाच्याने सेंद्रिय शेती करण्याचा पर्याय सांगितला. सुरुवातीला पाच-दहा गुठ्यांमध्येच हा प्रयोग सुरू केला. घरचेच बी-बियाणे, घरीच गावरान गाईच्या शेण-ेमूत्रापासून तयार केलेले जीवामृत, इतर औषध यामुळे कमी खर्चात चांगले व विषमुक्त उत्पादन मिळत असल्याचे लक्षात आले. नंतर संपूर्ण साडेचार एकरामध्ये सेंद्रिय शेती सुरू केली. आमच्या शेतात पिकणाऱ्या दहा-वीस किलो सेंद्रिय मालाला चांगली किंमत मिळत असल्याचे लक्षात आले. नंतर आजूबाजूच्या काही महिलांना सांगितले. किमान घरी खाण्यासाठी तरी सेंद्रिय शेतीचा सल्ला दिला. यामधून १०-२० महिला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ‘स्वराज युवा आत्मा’ बचत गट सुरू केला. त्याच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरू केले. नारायणगावचे कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने सर्व महिलांना प्रशिक्षण दिले. 
मुंबईच्या कृषी प्रगती यांना मालाची विक्री सुरू झाली. टाटा कंपनीनेदेखील मदत केली. आता पल्लवी हांडे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या २० हून अधिक महिला शेतकरी त्यांच्याच शेतात पिकवलेला सेंद्रिय शेतीमाल थेट आॅनलाईन अ‍ॅमेझॉन, स्टार बाजार, बिग बास्केट अशा मोठ्या कंपन्यांना विकतात. मालाचा दर्जा व उत्पादनातील सातत्य लक्षात घेऊन कंपन्यांकडून मोठी ऑर्डर मिळू लागली. वाढती मागणी लक्षात घेऊन गोळेगावलगतच्या जुन्नर, शिरूर तालुक्यांतील महिला शेतकऱ्यांनादेखील एकत्र करून ‘स्वतंत्र शेतकरी कंपनी’ स्थापन केली. आता या शेतकरी कंपनीच्या माध्यमातून खासगी कंपन्यांच्या मागणीनुसार कढीपत्ता, कोथिंबीरपासून विविध ३०-४० प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या आणि फळांचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतले जाते. 
........
* शेतमाल लावण्यापूर्वीच हमीभाव
 1 सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे व बाजारातील मागणी-पुरवठ्याच्या चढ उतारामुळे शेतमालाला कधी पैसे करून देईल व कधी मातीमोल दर मिळतील, सांगता येत नाही.

शेतकरी कंपनीच्या माध्यमातून शेतमाल लावण्यापूर्वीच शेतीला हमीभाव निश्चित केला जातो. यामुळे बाजारामध्ये कितीही दर पडले तरी सेंद्रिय शेती करणाºया शेतकºयांना किफायती दराची हमी मिळते. 

* शेतकरी महिला आर्थिक सक्षम

आमच्या गटातील महिला स्वत: शेतात पिकवलेल्या मालाची ऑर्डर मोबाईलवर घेतात. त्यानुसार मालाची तोडणी व पॅकिंग केले जाते. माल पोहोचवल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात शेतमालाचे पैसे जमादेखील होतात. आमच्या बचत गटातील महिला महिन्याकाठी सरासरी १५ ते २० हजारांचा निव्वळ नफा कमावतात. यामुळे शेतकरी महिलादेखील खºया अर्थाने आर्थिक सक्षम झाल्या आहेत.- पल्लवी गणेश हांडे, आदर्श महिला शेतकरी
.........

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Inspirational ..! Tenth pass Pallavi Handen turnover millions in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.