ढगाळ वातावरणामुळे शेतीपिकांवर अळी, मावा, तुडतुडे याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तरकारी पिकांवर तसेच फळभाज्या, पालेभाज्या, फळे यांवर हिरव्या, पिवळ्या तसेच काळ्या माव्याचा पादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
सततच्या ढगाळ हवामानामुळे कितीही औषधे मारली, तरीही मावा, अळी, तुडतुडे, तसेच सर्वच प्रकारच्या किडी आटोक्यात येण्याची शक्यता दिसत नाही. यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
त्यातच कोरोना मारामारीमुळे ब्रेक द चेन अंतर्गत शनिवार आणि रविवारी संपूर्ण मार्केट बंद ठेवण्यात येत आहे. परिणामी, दोन दिवसांत न तुटलेला शेतमाल याचबरोबर इतर पाच दिवसांत रखडलेल्या तोडणीयोग्य शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने तसेच किरकोळ विक्रेत्यांना फक्त सकाळी सात ते अकरा याच वेळेत विक्रीसाठी परवानगी असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर होत असून यामुळे शेतमालाचे बाजारभाव कोसळले आहेत. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सकाळी फक्त चार तास मालाची विक्री करता येत असल्याने खरेदीदार व्यापारी थोड्याच प्रमाणात मालाची खरेदी करत आहेत. कडक उन्हाळा असल्यान उत्पादन कमी निघत आहे. तर दुसरीकडे संपूर्ण मालाची विक्री होत नाही .पिकांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. एकीकडे शेतमालाला बाजारभाव नाही आणि दुसरीकडे औषधे व औषध फवारणीच्या वाढीव खर्चाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तसेच कांदा पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच उसावर लोकरी मावा दिसून येत आहे. त्यातच हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केल्याने बळीराजा धास्तावला आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांवर एकामागून एक संकट येत असल्याने बळीराजा पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांची काही संकटे संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.