उद्योगांनी पैसे दिले आणि पुण्यासाठी १२ ऑक्सिजन प्लँट खरेदी केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:12 IST2021-04-23T04:12:43+5:302021-04-23T04:12:43+5:30
प्राची कुलकर्णी पुणे : पुण्याची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी उद्योजकांनी मदतीचा हात दिला आहे. गेल्या दोन दिवसांत संकटाच्या प्रसंगी पुण्याच्या ...

उद्योगांनी पैसे दिले आणि पुण्यासाठी १२ ऑक्सिजन प्लँट खरेदी केले
प्राची कुलकर्णी
पुणे : पुण्याची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी उद्योजकांनी मदतीचा हात दिला आहे. गेल्या दोन दिवसांत संकटाच्या प्रसंगी पुण्याच्या ऑक्सिजनची गरज तर भागवलीच; पण आता १२ तयार असलेले प्लँट (प्रकल्प) विकत घेण्यासाठी आर्थिक मदतही दिली आहे. येत्या काही दिवसांतच हे प्लँट सुरू होणार आहेत.
पुणे प्लॅटफॅार्म फॅार कोविड रिस्पॅान्सच्या सुधीर मेहता यांनाी सांगितले की, मला माहिती मिळाली होती की औरंगाबादच्या एका कंपनीकडे १२ ॲाक्सिजन जनरेट प्लँट तयार आहेत. तातडीने कंपनीच्या मालकाशी संपर्क साधला. हे प्लँट पुण्यासाठी राखीव ठेवण्यास सांगितले. मात्र, पैसे दिल्याशिवाय ते होणार नव्हते. दुसऱ्या कोणी विकत घेण्याची भीती होती. यासाठी मग अधिकारी आणि वेगवेगळ्या कंपन्यांशी संपर्क साधून पैसा उभा करण्याची धडपड सुरू झाली. वेळ कमी होता आणि काम जास्त. थोडा उशीर झाला तर ते प्लाॅंट इतर कुठे दिली जाण्याची भीती होती. अखेर उद्योजक प्रशासन आणि राजकारणी एकत्र आले आणि १२ प्लँट खरेदी करण्याच्या ॲार्डरही गेल्या. यासाठी बजाज, टाटा आणि रांजणगाव इंडस्ट्रीज असोसिएशनच्या मदतीने पैसे उभे करण्यात आले. पुढच्या काही दिवसांत खासगी आणि सरकारी रुग्णालयातून हे प्लॅंट बसवले जातील. याबरोबरच ॲाक्सिजन कॅान्सन्ट्रेटर देखील खरेदी केले जाणार आहेत.
उद्योगांच्या मदतीने २४ तासांत भागली जिल्ह्याची गरज
पुण्यामध्ये मंगळवारी ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. या वेळी उद्योगांनी मदत करत २४ तासांच्या आत जिल्ह्याची गरज तर भागवली.
विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले की, दोन दिवसांच्या धावपळीनंतर गरजेइतकाच पुरवठा मिळत आहे. आता औद्योगिक क्षेत्रातून मदत उभी राहाते आहे. काही कंपन्या ज्या सध्या बंद आहेत त्या ॲाक्जिन पुरवठा करायला पुढे आल्या आहेत. याबरोबरच जे एस डब्ल्यू कडून ३० मेट्रिक टन पुरवठा सुरू झाला आहे.
ऑक्सिजनचे ऑडिट, गरज नसलेल्या दीड हजार रुग्णांचा पुरवठा केला कमी
अनेक रुग्णांना गरज नसतानाही ऑक्सिजन लावला जाण्याचे प्रकारही घडत आहेत. पुण्यात ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्यावर प्रशासनाने ऑडिट (तपासणी) सुरू केली. यामध्ये पहिल्या टप्प्यात पेशंटला गरजे इतकाच ॲाक्सिजन पुरवला जाईल यासाठी प्रयत्न प्रू झाले. दिवसभरातच खासगी रुग्णालयातले १२०० तर सरकारी रुग्णालयांमधले ३०० पेशंट हे स्टेप डाउन पद्धतीने त्यांच्या गरजेच्या ट्रिटमेंटला शिफ्ट करण्यात आले.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणे शहरासाठी महापौर निधीमधून दीड कोटीची तरतूद करून प्लॅंट घेतला आहे. हा प्लॅंट नायडू रुग्णालयात बसवला जाणार आहे. त्यातून आपल्याला मोठा दिलासा मिळेल. साधारण दहा दिवसांत हा प्लॅंट कार्यान्वित होईल.